महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून सिनेमा हॉल आणि नाट्यगृहे नियमांसह सुरु करण्याचा निर्णय दोन आठवड्यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. परंतु विविध स्तरांवरील गरजू कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. जो मायबाप सरकारने नुकताच पारित केला असून आर्थिक कुचंबणा झालेल्या संघटित आणि असंघटित कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी मंत्रिमंडळाने मदतीची सहमती दर्शविली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अध्यक्षस्थानी होते.
एकूण ३४ कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मान्यता घोषित केली आहे. या निर्णयासोबतच शेतकरी वर्गासाठीही दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे, रुपये १० कोटींची आर्थिक मदत पूरग्रस्त आणि अतिवृष्टी भागांसाठी जाहीर करण्यात आली. या दोन्ही निर्णयांचा विविध स्तरांतून आनंद व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये लोक कलावंतांना अतिशय हलाखीच्या दिवसांना सामोरे जावे लागले. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्या कारणाने त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली होती. त्यांच्या या विनंतीचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्र सरकारने प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह करणाऱ्या एकूण ५६ हजार कलावंतांना प्रत्येकी ५ हजार रुपये आणि ८०० हुन अधिक कला संस्थांना सुमारे ६ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
स्थानिक कलावंतांची निवड कारण्याबतचे निकाल ठरविण्यासाठी प्रशासकीय खर्ची मंजूर झाला असल्याने लवकर सर्व गरजू कलावंतांना आणि रंगकर्मींना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर कलावंतांनी वृत्तपत्र आणि शासकीय साईटच्या माध्यमातून येणाऱ्या जाहिरातीद्वारे अर्ज भरावयाचे आहेत. वैयक्तिक अर्जाची निवड प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी स्तरावरील समिती करणार असून संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या समितीव्दारे होणार आहे. सर्व निकषांवर पात्र झालेल्या कलावंतांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम दिली जाणार आहे. सिनेमा आणि नाटक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे, नाट्यगृह आणि सिनेमागृह प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर सर्व स्थिती पूर्ववत होईल अशी आशा करूया.