महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदीशोचे सर्व वयोमानातील रसिक चाहते आहेत. रोजच्या कामातला ताणतणाव दूर करण्याचे काम या हास्यजत्रेच्या माध्यमातून होताना दिसते. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेला विनोदवीर ओंकार भोजने आज या शोचा एक महत्वाचा भाग बनून गेला आहे. ओंकार भोजनेच्या अनोख्या स्किटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या वेगवेगळ्या स्किटमधील बोलण्यातला साधेभोळेपण, बोबडेपणा प्रेक्षकांना मनापासून भावला आहे. चला तर मग त्याच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात.ओंकार भोजने हा मूळचा रत्नागिरीतील संगमेश्वरचा, त्याचे शालेय शिक्षण चिपळूण मध्ये झाले..
चिपळूणच्या डी बी जे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अभिनयाची ओढ लागली आणि कॉलेज मधील विविध नाटक प्रयोगांच्या माध्यमातून त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून तसेच विविध नाटकांतून त्याने अभिनय करण्यास सुरुवात केली. या कॉलेज मधील तरुणांमध्ये आज ओंकार भोजने हे नाव तितकंच आदरानं घेतलं जातं हे विशेष. आपल्याला ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी’ व्हायचं असं त्याचं लहानपणीच स्वप्न होतं, पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर अंगच्या कलागुणांमुळे अभिनय क्षेत्रात त्याची गोडी वाढू लागली. कॉलेज मधील आठवणींबद्दल बोलताना तो म्हणतो, कॉलेजमध्ये नाटकात काम करण्यासाठी शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं, त्यांच्याच प्रेरणेने मी आज या क्षेत्रात कार्यरत आहे. जर मी डीबीजे कॉलेजमध्ये नसतो तर कदाचित मी कला क्षेत्रातच आलो नसतो.. इतकं ह्या कॉलेजने मला भरभरून दिलं आहे.
अगदी कॉलेजमध्ये आधल्या रात्री मागच्या बेंचवर झोपायचो तेव्हा सकाळी आलेले शिक्षक मुलांना ओरडून सांगायचे की ‘हळू बोला ओंकार मागच्या बेंचवर झोपलेला आहे’. ओंकारच्या घरच्यांना नाटक, सिनेमे बघायची आवड होती त्यामुळे त्याने या क्षेत्रात येऊ नये असा कधीच विरोध झाला नाही. एकांकिका, नाट्य स्पर्धांमध्ये काम करत असताना अनेकांना त्याचं काम आवडू लागलं, प्रेक्षकांची दाद मिळू लागली, या क्षेत्रात स्थान मिळवू शकतो हा आत्मविश्वास त्याला वाटू लागला. पुरुषोत्तम करंडक आणि नाट्यस्पर्धा गाजवत असताना त्याला कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस मध्ये काम करण्याची नामी संधी मिळाली. हा मोठा प्लॅटफॉर्म साकारत असतानाच त्याला ‘बॉईज २’ या चित्रपटात अभिनयाची भूमिका मिळाली. या चित्रपटात त्याने ‘नरू बोंडवे’ हे विरोधी पात्र लीलया साकारले. या भूमिकेने त्याच्या अभिनयाचे विविध पैलू उलगडले होते. जितक्या सहजतेने आज तो विनोदी भूमिका साकारतो अगदी तितक्याच सहजतेने त्याने हे विरोधी पात्र साकारले होते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून त्याच्या विनोदी स्किटची प्रेक्षक आतुरतेने नेहमीच वाट पाहत असतात. समीर खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्या सोबतचे त्याचे स्किट असो वा गौरव मोरे, वनिता खरात सोबत जुळून आलेली केमिस्ट्री, त्यातून उडणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते. ओंकार सोशल मीडियाचा वापर करत नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती मात्र काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे. याबाबत ओंकार म्हणतो की, टेकनिकली मला ह्या गोष्टी आवडत नाहीत आणि जमत ही नाहीत पण अपडेट राहायला हवं आणि चाहत्यांशी हितगुज करायला मला नक्कीच आवडेल. हळूहळू तो या गोष्टी स्वीकारत आहे आणि आज चाहत्यांशी संवाद देखील साधतोय. कधी कधी कर्तुत्वाची उंची इतकी असते की सन्मानाचं वजन त्यामुळे आपोआप वाढते, या उक्ती प्रमाणे आजवर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत अनेकांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना मनसोक्त हसवले अन ओंकार त्यातलाच एक मानाचा तुरा आहे असे म्हटल्यास वावगे ठरायला नको…