गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या बाबतीत पुढे असलेल्या पाहायला मिळत आहेत. आजवर आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा, मुलगी झाली हो या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. लवकरच या वाहिनीवर नव्या मालिका दाखल होणार आहे. “ठिपक्यांची रांगोळी” ही नवी मालिका पुढच्या महिन्यात म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणार आहे. रात्री १०.०० वाजता ही मालिका वाहिनीवर प्रक्षेपित केली जाणार आहे त्यामुळे “सांग तू आहेस का” ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठिपक्यांची रांगोळी या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच वाहिनीने रिलीज केला. त्यात बऱ्याचशा नव्या जुन्या कलाकारांची सांगड घातलेली पाहायला मिळत आहे. लीना भागवत, मंगेश कदम, शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान, अमृता फडके, सारिका नवाथे अशी भली मोठी स्टार कास्ट या मालिकेला लाभली असून अभिनेता “चेतन वडनेरे” मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेता चेतन वडनेरे अल्टी पल्टी , फुलपाखरू, लेक माझी लाडकी, काय घडलं त्या रात्री या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत कानिटकर कुटुंबाची चौकशी करणारी मुख्य अभिनेत्री कोण आहे त्याबद्दल आज जाणून घेऊयात. ठिपक्यांची रांगोळी या नव्या मालिकेतून अभिनेत्री “ज्ञानदा रामतीर्थकर” ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. ज्ञानदा ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा शहरातली आहे परंतु कामानिमित्त ती पुणे तसेच मुंबईत वास्तव्यास असते.
पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना ज्ञानदाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. अभिनयाची आवड जोपासत असताना कलर्स मराठी वाहिनीवरील “सख्या रे” या मालिकेतून तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने वैदेहीची भूमिका साकारली होती. जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे, शादी मुबारक या मराठी आणि हिंदी मालिकेतून तिला महत्वाच्या भूमिका मिळाल्या. धुरळा या गाजलेल्या चित्रपटातही ज्ञानदा महत्वाची भूमिका साकारताना दिसली. दोस्ती दिल धोका हा तेलगू चित्रपटही तिने साकारला आहे. ‘तू इथे जवळी रहा’, ‘प्रेमाची आरती’ या गण्यातूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. एका नव्या दमाची मालिका म्हणून या नव्या मालिकेचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे. मालिकेतील कलाकार आणि त्याचे कथानक प्रेक्षकांच्या मनात घर करतील की नाही हे मालिका पाहिल्यावरच समजेल तुर्तास या सर्वच कलाकारांना मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!!