अभिनेत्री केतकी चितळे हिने झी मराठी वरील तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेशिवाय आणखी काही मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत दिसली. केतकी चितळे ही वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने केलेला उल्लेख असो वा होळीच्या दिवशी घातलेला धिंगाणा, अशा बऱ्याच कारणामुळे केतकी वारंवार ट्रोलर्सला सामोरी जाताना आणि वादात अडकताना दिसली आहे. मध्यंतरी ट्रोलर्सने केलेल्या शिवीगाळवरून देखील तिने खडेबोल सुनावले होते. परंतु या सर्व गोष्टी होत असताना तिच्या गेल्या वर्षीच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ती आता कायद्याच्या चौकटीत घेरली गेलेली पाहायला मिळते आहे.
१ मार्च २०२० रोजी केतकी चितळेने एक पोस्ट लिहिली होती त्या पोस्टवरून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये ती नेमकी काय म्हणाली होती ते पाहुयात.. “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो” अशी वादग्रस्त पोस्ट लिहून तिने शेअर करताच अनेकांनी तिला धारेवर धरले होते. केतकीच्या वक्त्यव्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे ट्रोलर्सचे म्हणणे होते. ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते केवळ मुंबई दर्शनासाठी येतात… दलित समाज हा फुकटा असून तो महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे…’ असेही या पोस्टमध्ये तिने म्हटले होते.
केतकी चितळेच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चांगलीच अडचणीत पडली असून आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी आक्षेप नोंदवला आहे. स्वप्नील जगताप हे वकील असून केतकी विरोधात त्यांनी केस दाखल केली होती. त्यावर नुकतेच ठाणे कोर्टाने तिने दिलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. केतकीचा अर्ज फेटाळल्याने तीच्या अडचणीत आणखीनच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावरून तिला लवकरच अटक केली जाण्याची शक्यता प्रसार माध्यमांतून वर्तवली जात आहे.