मंगलमूर्ती मोरया, लवकरच गणरायाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठीची लगबग देखील आता घरोघरी पाहायला मिळत आहे. गणपतीची आरास कशी असावी? प्रसादासाठी कोणकोणते नैवेद्य बनवायचे? याची तयारी देखिल अगोदरच ठरलेली असते. मात्र ह्या सर्वातून आपण आरती पाठ करायचे विसरतो हे न उलगडणारे कोडे. कारण बऱ्याच जणांच्या आरत्या ह्या ऐकून ऐकूनच पाठ झालेल्या असतात. त्यामुळे आपल्याला आरती म्हणता येते हा एक गोड गैरसमज प्रत्येकाच्याच मनात रुजलेला पाहायला मिळतो आहे.
काही अंशी समूहातून कोण्या एकाच्याच ह्या आरत्याचा शब्द न शब्द पाठ असतील मात्र आरती म्हणणारे बाकीचेही त्याच अविर्भावात येऊन आरती पाठ असल्याचे मिरवताना दिसतात. आरतीच्यावेळी कडव्यांची अदलाबदल करणे हे देखील पाहणे बऱ्याच वेळा मजेशीर ठरते. चुकून एखादा व्यक्ती मोठमोठ्या आवाजात चुकीचे कडवे म्हणतो त्यावेळी सगळेच जण त्याच्याकडे बघतात मग तो आरती म्हणताना कसा चुकला हे त्याच्या लक्षात आणून देतात. मग अशावेळी आरतीच्या पुस्तकांचा देखील आधार घेतला जातो. ज्यांना आरती म्हणता येत नाही त्यांच्यासाठी हा उपाय तर अगदी त्यांच्यासाठी सहज सोपा वाटतो. कित्येक जण तर शब्दांमध्येही बदल करताना दिसतात…
शब्दा शब्दाचा अपभ्रंश होऊन बरेचसे शब्द नव्याने जन्माला येतात ही मजेशीर गोष्ट कित्येकदा अनुभवायला मिळते. ‘फणिवरबंधना’ हा शब्द ‘फळीवर वंदना’ म्हणूनही अनेकजण उच्चारताना दिसतात. ‘वक्रतुंड त्रिनयना’ ह्या शब्दाच्या जागी ‘वक्रतुंड त्रिवेना’ हाही शब्द अनेकांनी प्रचलित केलेला पाहायला मिळतो. ह्या शब्दांची अदलाबदली ही सामूहिक आरतीच्या वेळी सहज लक्षात येत नाही; इतरांचाही आवाज त्यामध्ये मिसळला गेल्याने हे अपभ्रंश कानावर आपोआप पडतात. आणि अशाच प्रकारे अनेकांनी आरत्या अगदी त्यांनी म्हटल्याप्रमाणे तोंडपाठ असल्याचे दर्शवतात. घालीन लोटांगण म्हणताना अनेकांना हा प्रश्न पडतो की उजवीकडून वळायचे की डावीकडून… अर्थात ह्या सर्व गमतीजमती उपस्थितांना पुरेपूर हसवून जातात हेही तितकेच खरे..
कित्येकदा कॉमेडी मालिकांच्या माध्यमातून वर्गणी मागणाऱ्यांची परीक्षा देखील घेतलेली पाहायला मिळते. त्यातून आरती म्हणणाऱ्याची कशी त्रेधा उडते हे पाहणे रंजक वाटते. या सर्व गोष्टींवरून अनेकदा मिम्स देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यावेळी आपण त्या व्यक्तीला टॅग करायला मात्र अजिबात विसरत नाही.. असो.. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळवत राहा आणि गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करा.. दास रामाचा वाट पाहे सजना – दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे – संकटी पावावे, वक्रतुंड त्रिनेत्रा – वक्रतुंड त्रिनयना, कायेन वाचा मछिंद्रसेवा – कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा, ओटी शेंदुराची – उटी शेंदुराची,ओवाळू आरत्या सुरवंट्या येती – ओवाळू आरत्या कुरवंड्या येती, लवलवती विक्राळा – लवथवती विक्राळा