झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता ‘मन उडू उडू झालं’ ही नवी मालिका सुरु झाली आहे, या नव्या मालिकेत दीपा आणि इंद्रची सुंदर प्रेमकहाणी दर्शवली आहे. हा इंद्रा नुकताच दिपूच्या प्रेमात पडला असून तिला पटवण्यासाठी तो आता नवनव्या युक्त्या करताना दिसतो आहे. हृता दुर्गुळे हिने साकारलेली दिपू प्रेक्षकांना खूपच भावली असून ती अभिनयात एक्सप्रेशन क्वीन मानली जाते. त्यामुळे हृताच्या चाहत्यांमध्ये तिच्या या मालिकेबाबत खूपच उत्सुकता पाहायला मिळते. मालिकेत दिपाची थोरली बहीण शलाका लवकरच लग्न करणार आहे. तिच्या लग्न सोहळ्यात होणारा खर्च पाहून देशपांडे कुटुंब मात्र तिच्या सासरकडच्या मंडळींसमोर पुरते हतबल होणार आहेत. नुकतेच साखरपुड्याच्या खरेदीसाठी बँकेतून काढून आणलेले पैसे देखील चोरीला गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शलाकाचे हे लग्न होणार की नाही? ह्याचे उत्तर लवकरच मालिकेतून पाहायला मिळेल.
तुर्तास मालिकेत शलाकाची भूमिका साकारणारी ही नायिका कोण आहे त्याबद्दल जाणून घेऊयात….
मालिकेत शलाकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “शर्वरी कुलकर्णी”. शर्वरी ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “संपदा कुलकर्णीची” लेक आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. अभिनय आणि निवेदन या कलांबरोबरच त्यांनी कथ्थक नृत्य आणि लेखनात ठसा उमटवला आहे. ठाण्यातील ‘कला सरगम’ या संस्थेच्या बालनाट्यातून अभिनयाची सुरुवात केली होती. आईचं घर उन्हाच, घर तिघांचं हवं, शर्यत, आटली बाटली फुटली, ऑल द बेस्ट, वाऱ्यावरची वरात, आप्पा आणि बाप्पा अशा अनेक कलाकृतीतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. संपदा कुलकर्णी या सध्या आपल्या कोकणातील गावी नवऱ्यासोबत शेती करताना दिसत आहेत. एक विरंगुळा म्हणून त्यांनी शेती क्षेत्राकडे उचललेलं हे पाऊल सर्वांना प्रेरणा देणारेच आहे. त्यांची लेक शर्वरी कुलकर्णी ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सोनी मराठीवरील आनंदी हे जग सारे ह्या मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती.
शिवाय कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्यस्पर्धा तिने साकारल्या आहेत. शर्वरी आता झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. झी मराठीचा प्लॅटफॉर्म मिळाल्याने शर्वरी आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे. फेब्रुवारी महिन्यात शर्वरीचा विवाह झाला होता. विभव बोरकरसोबत तिने ही लग्न गाठ बांधली होती. लग्नानंतरची तिची ही पहिलीच टीव्ही मालिका आहे. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपा अशा तीन वेगवेगळ्या स्वभावाच्या बहिणी दाखवल्या आहेत. त्यात तिने साकारलेल शलाकाचे पात्र राडूबाई प्रमाणे आहे. ही भूमिका तिने तिच्या अभिनयातून चांगलीच वठवलेली पहायला मिळत आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीला मनःपूर्वक शुभेच्छा….