गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी वरळी येथील डोम नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच ‘महाराष्ट्र भूषण २०२३ पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मंचावर त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ देखील उपस्थित होत्या. ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२२’ ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात अरुणा इराणी, मिथुन चक्रवर्ती, सोनू निगम आणि हेलन यांना ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने’ गौरविण्यात आले. तर दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी यांना मरणोत्तर ‘चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. रविंद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी याने हा पुरस्कार स्वीकारलेला पाहायला मिळाला. तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, उषा नाईक यांनाही ‘चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, गायक रविंद्र साठे, अभिनेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. त्याच जोडीला सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, महेश मांजरेकर, शिल्पा नवलकर, कविता लाड, ललित प्रभाकर, सुकन्या मोने, नंदिता धुरी, अलका कुबल, किरण शांताराम, सुध्दार्थ जाधव, जयवंत वाडकर, सोनाली कुलकर्णी, पार्थ भालेराव या कलाकारांनीही आवर्जून हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट सुरूच ठेवला होता. तेव्हा अशोक सराफ खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले.