मनोरंजन जगतासाठी आणखी एक दुःखाची बातमी समोर आली आहे. काल हिंदी चित्रपट मालिका अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आणि आज २१ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी समोर आली. या एकापाठोपाठ एक आलेल्या बातमीने कला सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. अमीन सायनी यांनी काल २० फेब्रुवारी रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्याने गितमालाचा भारदस्त आवाज हरपला अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अमीन यांचा मुलगा राजील सयानी यांनी या बातमीला दुजोरा देताना म्हटले की, अमीन सयानी यांनी काल रात्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उद्या गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबईत जन्मलेले अमीन सयानी हे रेडिओचा आवाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आकर्षक शैलीने प्रेक्षकांना मोहित केले होते. अमीन सयानी यांनी कारकिर्दीची सुरुवात इंग्रजी भाषिक निवेदक अशी केली होती.
पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतर हिंदीमध्ये त्यांनी निवेदन करण्यास सुरुवात केली. ‘गीतमाला’ या रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे ते प्रचंड लोकप्रियता मिळवताना दिसले. ज्या काळात रेडिओ हे मनोरंजनाचे माध्यम बनले त्या काळात अमीन यांच्या आवाजाने श्रोत्यांना भुरळ घालण्यास सुरुवात केली होती. गितमाला मध्ये अनेक हिंदी चित्रपट गीतं ऐकवली जायची. त्यांच्या निवेदनाने अनेक दशके श्रोत्यांना मोहित केले होते. “बेहनो और भाइयों” असा आवाज कानी पडला की श्रोते अमीन यांचा आवाज लगेचच ओळखायचे. अमीन यांच्या जाण्याने गितमालाचा भारदस्त आवाज हरपला अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.