येत्या १२ फेब्रुवारी पासून झी मराठी वाहिनीवर शिवा मालिका प्रसारित केली जाणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर अभिनेता शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री पूर्वा फडके हिला त्याची नायिका बनण्याची संधी मिळाली आहे. तिखट स्वभावाची शिवा आणि गोड स्वभावाचा आशु यांची ही कहाणी मालिकेत पहायला मिळणार आहे. या मालिकेत शिवाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आशूच्या आईची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी साकारली आहे.
सिताई हे पात्र त्या मालिकेत साकारत आहेत. मीरा वेलणकर या दिग्दर्शिका तसेच निर्मात्या देखील आहेत. बटरफ्लाय या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. तसेच याअगोदर स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या तू तेव्हा तशी या मालिकेत मीराने एक छोटीशी भूमिका साकारली होती. मीरा वेलणकर या प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची मुलगी आहे. मधुरा, मीरा आणि गौरी अशी तीन अपत्ये त्यांना आहेत. मधुरा वेलणकर ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयाचा तिचा प्रवास आजतागायत सुरू आहे. तर आई रजनी वेलणकर यांनी झी मराठीच्याच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आजीची भूमिका साकारली होती.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून त्यांच्या पात्राची एक्झिट करण्यात आली होती. त्यामुळे आई झी मराठीवरन बाजूला होताच मुलीची एन्ट्री झाली अशी चर्चा शिवा मालिकेमुळे होत आहे. मीरा वेलणकर यांनी बऱ्याच प्रतीक्षेनंतर झी मराठी वाहिनीवर पुनरागमन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत मीरा वेलणकर यांनी नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. पण अभिनयाला पुरेसा वाव मिळत नसल्याने कालांतराने मीरा वेलणकर या मालिकेतून बाजूला झाल्या होत्या. पण आता नायकाच्या आईची दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याने त्यांनी शिवा मालिकेला होकार दिला. मालिकेत एका सोज्वळ आईची भूमिका त्या उत्तम निभावतील असा विश्वास आहे. या भूमिकेसाठी मीरा वेलणकर यांना मनपूर्वक शुभेच्छा.