झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता ही मालिका झी युवा या वाहिनीवर पुन्हा एकदा प्रसारित केली जात आहे. या मालिकेमुळे किरण गायकवाड प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवताना दिसला. डॉ अजितकुमार देव हे त्याने साकारलेले विरोधी पात्र प्रथमच नायका इतकेच लोकप्रिय झाले होते. या मालिकेनंतर किरण गायकवाड चित्रपटातून मोठ्या पदद्यावर झळकू लागला आहे. फौज आणि आंबट शौकीन असे त्याचे दोन आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

अभिनयाचा हा यशस्वी प्रवास सुरु असतानाच त्याने काल १ फेब्रुवारी रोजी मालिकेची नायिका डिंपल म्हणजेच अस्मिता देशमुखला प्रपोज केल्याची बातमी सोशल मीडियावर जाहीर केली. आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का असे म्हणत किरणने त्याच्या सोशल मीडियावरून अस्मिताला प्रपोज केल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर आज अस्मिताने किरणने हे प्रपोजल स्वीकारत किरण, तुम्ही म्हणाल तसं. सांगूयात सगळ्यांना असे म्हणत हातात हात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. किरण आणि अस्मिताच्या या जाहीर कबुलीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात झाली आहे.

खरं तर किरण गायकवाड आणि अस्मिताचे खऱ्या आयुष्यातही लग्न व्हावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण या फोटोमागे काहीतरी वेगळं गुपित आहे असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. अस्मिता आणि किरण कुठल्यातरी नवीन प्रोजेक्टसाठीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत हे त्यांच्या पोस्टवरून प्रकर्षाने जाणवते. कारण मराठी सेलिब्रिटींपैकी अजून कोणीच त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स दिलेल्या नाहीत. त्यामुळे हा कुठलातरी पब्लिसिटी स्टंट असावा अशी शंका उपस्थित केली जात आहे. देवमाणूस मालिकेनंतर आता त्याचा तिसरा पार्ट येतोय का अशा त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया मिळत आहे. पण अस्मिता सध्या सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारत आहे.
ही मालिका आताच प्रेक्षकांच्या भेटीला आली असल्याने तूर्तास तरी ती नवीन मालिका स्वीकारणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख यांचे कुठलेतरी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत असावे. त्यासाठीच त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असावे असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान या फोटोमागचे आणि प्रपोजलमागचे नेमके गुपित काय आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.