मराठी सृष्टीत सगळ्या कलाकारांना सांभाळून घेण्याचे काम जयवंत वाडकर यांनी नेहमीच केलेले आहे. त्यामुळे त्यांना या इंडस्ट्रीत कार्यकर्ता अशी ओळख मिळाली आहे. कुठल्याही कार्यक्रमात जयवंत वाडकर हजेरी लावणार असतील तर कलाकार मंडळी निश्चिंत होऊन जातात. कॉलेजमध्ये असताना एकांकिकेसाठी पैसे मंजूर करून घेणे, घरून डबे आणून सहकलाकारांना जेवू घालणे. कुठे काही अडचण असेल तर जयवंत वाडकर पुढाकार घेऊन असे प्रश्न स्वतः सोडवतात.
खरं तर प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर या मित्रांच्या मदतीनेच जयवंत वाडकर यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांना खरी आवड होती ती क्रिकेटची. पण या मित्रांची साथ मिळाली आणि त्यांच्या मदतीने मी मोटिव्हेट ऍक्टर बनलो असे ते म्हणतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयवंत वाडकर यांनी शिस्तीत राहून रंगदेवतेशी कसं प्रामाणिक राहावं याचं उदाहरण सांगितलं आहे. ते म्हणतात की, मी साहित्य संघात आल्यानंतर माझ्यात एक शिस्त अंगवळणी पडली. रंगमंचावर आल्यानंतर जे कपडे आणि चपला वापरल्या जायच्या त्यांचा आदर ठेवला जायचा. त्या चपला घालून तुम्ही टॉयलेटला गेला तर कॉस्टयूम डिपार्टमेंटचे पटवर्धन काका येऊन जोराने कान पिळायचे.
मेकअप रूममध्ये आपण मेकअप करायला बसतो तेव्हा आताची मुलं, मुली तिथेच येऊन चपला, बूट काढतात. मला त्यांचं हे वागणं पटत नाही कारण तुम्ही मेकअप करता म्हणजे ती रंगदेवता आहे. मेकअपमन येऊन तिथे टीका लावत असतो आणि नंतर आपला मेकअप करतो म्हणजे तिथे काहीतरी भावना असायला हवी ना. मी त्यांना तिथेच चपला सोडल्या तर एकदा सांगतो, दोनदा सांगतो की त्या उचलून बाहेरच्या चपलांजवळ ठेवा. पण जर नाही ऐकलं तर मी त्यांच्या चपलेवर स्प्रे घेऊन पाणी मारतो. मग त्यांना समजतं की हे काम वाडकरांनी केलेलं आहे. त्यामुळे काहीच न बोलता तिथून पुढे ते त्या चपला बाहेरच ठेवायला तयार होतात. आताच्या लोकांनी हे सगळं पाळलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया ते या अपमानावर देतात.