मराठी सेलिब्रिटी विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरु झालेली आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी टाईमपास चित्रपट फेम प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर ते दोघे लवकरच विवाहबद्ध होतील असे जाहीर करण्यात आले आहे. तर अभिनेत्री पूजा सावंत हिच्याही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. २०२४ हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे आणि याच वर्षात मी सिद्धेश सोबत लग्न करणार असेही पूजाने जाहीर केले आहे. लग्नाची लगबग सुरू आहे आणि लवकरच तारीखही जाहीर करण्यात येईल असे तिने म्हटले आहे.
पण या दोघांच्याही अगोदर मराठी मालिका सृष्टीतील लाडकी जोडी म्हणजेच शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या लगनिघाईला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच अमृताच्या जवळच्या मित्रांनी तिच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. ब्राईड टू बी असे म्हणत अमृता आणि शुभंकर लवकच लग्न करणार असल्याचे यातून त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ही लगीनघाई पाहण्यासाठी चाहते देखील खूपच उत्सुक आहेत. अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा हा प्रेमविवाह आहे. कन्यादान या मालिकेतून एकत्रित काम करत असताना शुभंकर अमृताच्या प्रेमातच पडला. अमृतानेही शुभंकरला त्याच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आणि गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोघांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला.
दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे ही शुभंकर एकबोटेची आई आहे. एका मुलाखतीत शुभंकरने म्हटले होते की, आज आई असती तर तिने अमृताची सून म्हणून नक्कीच परीक्षा घेतली असती. असे म्हणत तो आईच्या आठवणीत भावुक झाला होता. हा क्षण पाहायला आई असायला हवी होती असेही तो म्हणाला होता. शुभंकर एकबोटे आणि अमृता बने या दोघांनीही उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वतःची या इंडस्ट्रीत ओळख बनवली आहे. मालिका, चित्रपट असा त्यांचा यशाचा प्रवास सुरु आहे. अशातच योग्य वेळी घेतलेला लग्नाचा निर्णय पाहून त्यांचे चाहत्यांकडून कौतुकच केले जात आहे. त्यामुळे या लग्नसोहळ्याची धामधूम कशी असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.