काल पिंपरी चिंचवड येथे १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या सोहळ्यात राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. राज ठाकरे मराठी कलाकारांच्या बाजूने नेहमीच बोलत असतात त्यांना प्रोत्साहन देत असतात. पण काल पहिल्यांदाच त्यांनी मराठी कलाकारांची चांगलीच कानउघाडणी केलेली पाहायला मिळाली. मराठी कलाकारांना उद्देशून त्यांनी एक कानमंत्र दिला तो आता सगळ्या कलाकारांना सर्वमान्य झालेला पाहायला मिळतो आहे. अगदी तेजस्विनी पंडित, राजन पाटील, प्रिया बेर्डे यांनीही राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन दर्शवले आहे.
राज ठाकरे या मंचावर नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात. मी आज ठरवून आलोय की सगळ्या कलाकारांना मला एक गोष्ट सांगायची आहे. मी जेव्हा बाहेरच्या राज्यात जातो तेव्हा तिथल्या कलावंतांना भेटतो आणि ज्यावेळी आपल्या कलावंतांना भेटतो. यात मला काही वेळेला ज्या चुका दिसतात त्या मी आज इथे मांडणार आहे. यासाठी मी मराठी कलाकारांची एक बैठक किंवा शिबिर भरवणार होतो. पण आज १०० व्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला हे सर्व कलाकारांना जे उपस्थित असतील नसतील त्यांनाही मी जे सांगतो ते कृपा करून ऐका. पहिली आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांना जर मान दिला नाहीत, लोकांसमोर अद्या, पद्या, भेंड्या, अंड्या जर अशा नावाने हाका मारता ते लक्षात असू द्या की हे तुम्ही लोकांच्यासमोर बोलता.
मराठी चित्रपट सृष्टी खूप मोठी आहे, पण त्याला कोणी स्टार नाही. तुम्ही तमिळ, तेलगू सृष्टी बघा तिथे स्टार आहेत, महाराष्ट्रात स्टार्स होते. आजही अनेक कलावंतांमध्ये ते सगळे गुण आहेत पण आपणच लोकांना एकमेकांसमोर पब्लिकमध्ये टोपण नावाने हाका मारतो. तुम्ही जर तुमचा मान राखला नाहीत तर लोकं काय तुम्हाला मान देतील? रजनीकांत यांना तिकडे रजनी सर म्हणून हाक मारतात, कमल हसन यांना कमल सर म्हणतात. ते एकमेकांच्या सोबत दारू पित असले तरी ते स्टेजवर आल्यावर मात्र सर म्हणून हाक मारतात. त्यांचे वैयक्तिक कितीही वाद असले तरी ते एकमेकांना सर म्हणतात. मला वाटतंय मराठी कलाकारांनी ही गोष्ट आजपासून लक्षात ठेवावी की तुम्ही जर लोकांसमोर एकमेकांना मान दिला तरच लोकांकडून तुम्हाला मान मिळेल.
तुम्ही नाक्यावर उभे असाल तर तुम्हाला पैसे देऊन कोणी बघायला येणार नाही. तुमचं मोठेपण तुम्हीच जपायला हवं. तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे इतरांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे. तर लोकं तुम्हाला मोठं म्हणतील. असे म्हणत राज ठाकरे यांनी कलाकारांचे चांगलेच कान पिळलेले पाहायला मिळाले. त्यांच्या या वक्तव्यांचा कलासृष्टीत चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे. इथून पुढे आता या गोष्टी आचरणात आणल्या जाव्यात अशीच एक चर्चा सुरू आहे.