चंद्रमुखी या चित्रपटामुळे अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांच्यात एक वाद झाला होता. खरं तर चंद्रमुखी हा चित्रपट अगोदर सुबोध भावे दिग्दर्शित करणार होता. त्यावेळी विश्वास पाटील, सुबोध भावे आणि मानसी नाईक हे एकत्रित बसले असतानाच सुबोधने मानसीकडे पाहून तूच माझी चंद्रमुखी असे म्हटले होते. अर्थात ही केवळ त्याने त्यावेळी मानसीला दिलेली एक दाद होती. पण त्यानंतर चंद्रमुखी हा चित्रपट प्रसाद ओक दिग्दर्शित करणार असे ठरले. मानसीने याच मुद्द्यावरून हा चित्रपट अगोदर मी करणार होते एवढेच म्हटले होते.
चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी मानसीच्या या वक्तव्यावर प्रसादने देखील खरमरीत शब्दांत तिचा समाचार घेतला होता. तर अमृताचा या भूमिकेसाठी योग्य होती असे त्यावेळी म्हणण्यात आले होते. हा वाद नेमका काय होता हे काही दिवसांपूर्वीच मानसी नाईकने स्पष्ट केले होते. भार्गवी चिरमुले हिच्या पॉडकास्टला मानसीने एक मुलाखत दिली होती. तेव्हा तिने या वादावरचा पडदा हटवला होता. ही भूमिका मी करावी अशी सुबोधची इच्छा होती. परंतु त्यानंतर दिग्दर्शक बदलला, सर्वच बदललं त्यामुळे हा चित्रपट आपण स्वतः साइन केल्याशिवाय माझा आहे असे कोणीही म्हणणे चुकीचे असते. ही गोष्ट अमृताला देखील ठाऊक होती.
मी त्या चित्रपटावर साईनच केली नव्हती त्यामुळे मी तो माझा चित्रपट आहे हे मी म्हटलेच नव्हते. केवळ त्या भूमिकेसाठी माझे नाव सुचवले असे मी म्हटले होते. पण चित्रपट रिलीज होत होता तेव्हा हा वाद अधिकच चिघळला. अमृताने मला फोन करून नाही नाही ते ऐकवलं होतं. तिलाही हे माहितीच आहे की या इंडस्ट्रीत खूप कमी कलाकार आहेत एकमेकांना समजून घ्यायला हवं पण तिने तसं न करता मला नको ते ऐकवलं. मी अमृताची खूप मोठी फॅन होती पण तिने ती फॅन गमावली, असे मानसी नाईक या मुलाखतीत म्हणाली होती. मानसीने तिचा अमृतावरचा राग या मुलाखतीतून बाहेर काढला होता. त्यावर अमृताने मात्र गप्प राहणे पसंत केले होते.
पण नुकत्याच चाहतीच्या एका प्रश्नावर अमृताने याला उत्तर देण्याचे ठरवले. अमृताच्या एका चाहतीने तिला सोशल मीडियावर याबद्दल एक प्रश्न विचारला की, चंद्रमुखीच्या वेळेला मानसी नाईक पण बोलली होती. तुझ्यावर पण तिने आरोप लावले. पण यावर तू कधीच काही बोलली नाही. त्याबद्दल खर जाणून घ्यायला आवडेल. कारण या सर्वांमुळे तुला कोणी निगेटिव्ह बोलायला नको. चाहतीच्या या प्रश्नाचे उत्तर देताना अमृता म्हणते की, कधी कधी आपण सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर युअर लाईफ असंच बोलू शकतो. मला असं वाटतं की प्रत्येकजण स्ट्रगल करतो मी सुद्धा आणि म्हणून काइंडनेस इज रिकवायर्ड इन धिस वर्ल्ड, आय ऑलवेज विश द बेस्ट फॉर एव्हरीवन.