महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रसिद्धीस आलेल्या समीर चौघुले यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल काळाचा उलगडा केला आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर समीर चौघुले किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये नोकरी करत होते. कमर्शियल ऑफिसमध्ये एका चांगल्या पोस्टला ते काम करत होते. नोकरी करत असतानाच नाटकाचीही ते आवड जोपासत होते. कामावरून घरी आलं की नाटकाचा दौरा हे त्यांचे नित्याचे ठरलेले असायचे. दिवसभर काम आणि रात्री बाईकने नाटकाचा दौरा.
परत सकाळी उठून काम या दोन्ही गोष्टींमुळे त्यांची तारेवरची कसरत होत होती.
हे पाहून समीर चौघुले यांच्या पत्नीनेच त्यांना नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. त्यावेळी म्हणजेच २००० साली या नोकरीतून समीर चौघुले यांना २५ हजार रुपये महिन्याला पगार मिळत होता. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी होती. त्यामुळे नोकरी सोडावी की नाही असा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. पण असे हाल होत असल्याचे पाहून पत्नीनेच त्यांना पाठिंबा दर्शवला. आपण कमीत कमी वरणभात तरी खाऊ एवढ्या पगाराची मी नोकरी करू शकते, तू तुझी आवड जोपास. असे म्हणत समीर चौघुले यांच्या पत्नीने त्यांना नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. आता मागे वळून पाहताना नोकरी केली असती तर बरं झालं असतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
तेव्हा समीर चौघुले म्हणतात की, नोकरी केली असती तर बरं झालं असतं असं मला नाही वाटत पण अगोदरचं चांगलं होतं हे ते अधोरेखित करतात. समीर चौघुले स्वतःला सोंगाड्या मानतात. चार्ली चॅप्लिन, दादा कोंडके यांना ते आपले गुरू मानतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हाच सोंगाड्याचा पिंड. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये समीर चौघुले यांच्या अभिनयाचे अनेक पैलू उलगडताना दिसले. विनोदाचे अचूक टायमिंग असो किंवा तोंडाने वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज काढणे असो यातून ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसले आहेत. मधल्या काळात गौरव मोरे, विशाखा सुभेदार आणि ओंकार भोजने यांच्या अनुपस्थितीत समीर चौघुले यांनी त्यांच्या खांद्यावर हास्यजत्राची धुरा सांभाळली होती. त्यामुळे हास्यजत्रेतील एक मानाचं पान अशी त्यांनी ओळख बनवलेली आहे.