मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री मानसी सिंग मोहिले हिला ३१ ऑगस्ट २०२३ रोजी कन्यारत्न प्राप्ती झाली होती. मानसी मोहिले हिने स्वामिनी, श्रीमंताघरची सून, काहे दिया परदेस अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, निर्माते तसेच अभिनेते प्रभाकर पणशीकर यांची ती नात आहे. प्रभाकर पणशीकर यांची कन्या म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री जान्हवी पणशीकर सिंग यांना दोन मुली आहेत, मानसी ही त्यांची थोरली कन्या होय. सिद्धार्थ मोहिले सोबत मानसीचा विवाह झाला.
दोन महिन्यांपूर्वी मानसी आणि सिध्दार्थला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. तेव्हा हिंदी सृष्टीतून आणि मराठी सृष्टीतून तिचे अभिनंदन करण्यात आले होते. आता तिची लेक दोन महिन्याची झाली आहे. नुकताच तिच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पडला. मानसीने तिच्या लेकीचे नाव ‘साची’ असे ठेवले आहे. साची नावाचा अर्थ खूपच खास आहे. भगवान इंद्राची पत्नी म्हणूनही या नावाला ओळख आहे. साची म्हणजेच आनंद. आधुनिक, स्वैच्छिक, लक्षपूर्वक, सर्जनशील, अस्थिर, उदार, अनुकूल, आनंदी, सक्रिय,भाग्यवान अशा गुणांनी हे नाव सजलेलं आहे. मानसीची आई आणि वडील दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.
जान्हवी पणशीकर सिंग आणि शक्ती सिंग या कलाकार दाम्पत्याने हिंदी सृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. जान्हवी पणशीकर यांनी मराठी रंगभूमीवर काम केले त्यांना चित्रपट मालिकेत फारसे काम मिळाले नाही पण मुरांबा या मराठी मालिकेत त्या एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत त्या प्रेमळ आजीची भूमिका साकारत आहेत. तर मानसीने देखील आपल्या आजोबा तसेच आई वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवलेला पाहायला मिळाला. चित्रपट तसेच मालिकेतून झळकलेल्या मानसीने हिंदी सृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली. अशातच आता मुलीच्या जन्मानंतर तिने अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.