कलाकारांचे रील लाईफ जसे संकटांनी भरलेले असते तसेच रिअल लाईफमध्येही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. घर, शूटिंग, प्रवासाची दगदग, कामाचे पैसे मिळायला विलंब अशा कित्येक गोष्टी सहन करत ही मंडळी संसाराचा गाडा चालवत असतात. लागीरं झालं जी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या पुष्पा मामी म्हणजेच अभिनेत्री कल्याणी चौधरी सोनवणे यांनीही आयुष्यातील संकटांना हसत हसत सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची दहा वर्षांची चिमुरडी अजूनही संकटांचा सामना करत आहे. पण यात त्या स्वतःला खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुकतेच नवरात्रीचे औचित्य साधून कल्याणी सोनवणे यांनी समाजातील प्रतिष्ठित महिलांना सन्मान देऊन त्यांच्या ताकदीचे दर्शन घडवले आहे. सोबतच त्या त्या रंगांचे महत्वही तिने पटवून दिले आहे. आशा भोसले, प्रतिभा पाटील, सुद्धा मूर्ती नंतर आज ज्वाला गुट्टा यांना तिने सन्मान दिला आहे. यानिमित्ताने कल्याणी सोनवणे यांनी आपल्या लेकीच्या कठीण काळातील प्रसंगाचा उलगडा करताना म्हटले आहे की, मी कल्याणी नंदकिशोर म्हणजेच झी मराठी वरील “लागिरं झालं जी” मधली आज्याची मामी. “मन झालं बाजिंदं” मधली गुली मावशी, कलर्स मराठी वरील “राजा राणी ची गं जोडी” मधली पंजाबरावची बायको कल्याणीबाई. सन मराठी वरील “शाब्बास सूनबाई” मधली ईश्वरी.
२७ नोव्हेंबर २०१४ ला खुशीचा जन्म झाला. साधारण १५ दिवसातच तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं आम्हाला समजलं. अनेक तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे तिच्या अनेक तपासण्या झाल्यानंतर आणखी एक निदान समोर आलं. तिच्या हृदयापासून फुप्फुसापर्यंत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या बंद आहेत. अनेकदा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केले पण तिच्या शरीराची अंतर्गत रचना या प्रकारे आहे की तिला भूल देणं सुद्धा शक्य होत नव्हतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खुशी जास्तीत जास्त सहा महिने जगू शकणार होती. पण मला विश्वास होता की स्वामी आई माझ्या पोटी जन्माला आलेली आहे आणि तीच या संकटातून मला आणि माझ्या लेकीला बाहेर काढेल.
आज खुशी १० वर्षांची झाली आहे. या १० वर्षांत अनेकदा तिच्यावर संकटं आली. पण माझा विश्वास आणि आम्ही सगळे मिळून तिची घेत असलेली काळजी याच्या जोरावर ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलेली आहे. आणि पुढे सुद्धा ती हा लढा सुरुच ठेवेल अशी मला खात्री आहे. आजचा रंग निळा, निळा रंग म्हणजे पाण्याचं आणि आकाशाचं प्रतीक. निळा रंग व्यापकता दाखवतो. तीच व्यापकता खेळाडू वृत्तीने घेत मी आणि खुशी अगदी खुशीत हसत खेळत आयुष्य भरभरुन जगत आहोत.