सध्या मराठी सृष्टीतील ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही लाडकी जोडी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश नारकर हे त्यांच्या सहकलाकारांसोबत रिल्स बनवत होते. त्यांचा हा मजेशीर डान्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र काहींना त्यांचा डान्स मुळीच रुचला नाही. त्यामुळे अविनाश नारकर नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जात होते. या टिकाकारांकडे दुर्लक्ष करत अविनाश नारकर आपले रिल्स बनवत बिनधास्त जगण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आता ऐश्वर्या नारकर देखील त्यांच्या जोडीला वेगवेगळ्या गाण्यांवर रिल्स बनवू लागल्या.
टीकाकारांकडे दुर्लक्ष करत नवऱ्याची साथ देऊ लागल्या. पण आता या दोघांचे हे रिल्स पाहून टीकाकारांनी त्यांना आजोबांचीच उपमा देऊ केली आहे. तर काहींनी म्हातारचळ लागलेले आजी आजोबा म्हणत हिणवण्याचा प्रयत्न केला. पण आता अशा टिकेला जिथल्या तिथे उत्तर देण्याचा निर्णय ऐश्वर्या नारकर यांनी घेतला आहे. अविनाश नारकर यांना आजोबा म्हणणाऱ्या एका नेटकऱ्याला ऐश्वर्या यांनी चक्क पणजोबा म्हणत खरपूस समाचार घेतला आहे. तर म्हातारचळ लागलेले आजी आजोबा या टीकेला उत्तर देताना ऐश्वर्या नारकर म्हणतात की, बुद्धी गंजेल असे विचार करून तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागायचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर सगळंच राहून जाईल दुसऱ्यांना बोलण्यात.
म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा, बुद्धी भ्रष्ट. असे म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे. पण या रीलवर त्यांचे अनेकांनी कौतुकही केलेले पाहायला मिळत आहे. एकमेकांना साथ देत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक क्षण हा स्वतःच्या इच्छेनुसार जगला पाहिजे. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं, लोक काहीही केलं तरी नावंच ठेवतात. त्यामुळे आपल्या मनाला जे पटेल जे आवडेल ते आपण करायला हवं. दोघांची जोडी एव्हरग्रीन आहे आणि या दोघांसारखं आयुष्य जगता आलं पाहिजे अशीही प्रतिक्रिया त्यांना मिळत आहे.