मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक शरद पोंक्षे पुन्हा एकदा रंगभूमीवर घेऊन येत आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. मात्र शरद पोंक्षे यांच्या या नाटकाच्या नावावर निर्माते उदय धुरत यांनी आक्षेप घेतला आहे. उदय धुरत यांनी १९९८ साली हेच नाटक रंगभूमीवर आणलं होतं, त्यात शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यानंतर उदय धुरत यांनी हे नाटक बंद केले. पण जुलै महिन्यात या नाटकाची जाहिरात करून त्यांनी ऑगस्ट मध्ये हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे जाहीर केले होते. अभिनेता सौरभ गोखले या नाटकात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
सौरभची निवड खुप उशिरा करण्यात आल्यामुळे हे नाटक आता नोव्हेंबर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे सांगण्यात आले होते. परंतु त्यागोदरच शरद पोंक्षे यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलं आहे. त्यामुळे उदय धुरत यांनी नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप शरद पोंक्षे यांच्यावर लावला होता. उदय धुरत यांनी यासंदर्भात शरद पोंक्षे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या प्रक्रियेनंतर शरद पोंक्षे यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. धुरत यांनी लावलेल्या नाटकाच्या शिर्षकाच्या चोरीच्या आरोपांवर शरद पोंक्षे म्हणतात की, नथुराम गोडसे ही माझी अत्यंत आवडती भूमिका आहे. आम्ही सगळे भूमिकेवर प्रेम करणारे कलावंत आहोत. त्यामुळे कोर्ट कचेऱ्या करून आम्हाला हे नाटक थांबवायचं नाहीये. हे नाटक तुम्हीही करा, आम्हीही करतो. मागे एकदा नाशिकच्या ग्रुपनेही हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेत केलं होतं.
सगळ्यांना करू दे हे नाटक. समजा याला कोणी विरोध करत असेल तर त्याला आम्ही कोर्टातच उत्तर देऊ. मी उदय धुरत यांना १९९८ पासून ओळखतो. त्याने फक्त लोकांना छळायचं आणि त्रास द्यायचं काम केलेलं आहे. नाव सेम आहे म्हणून आता त्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. त्यांनी कोर्टात जाण्याची धमकी दिली तर आम्हीही कोर्टात जाऊ, असे सडेतोड उत्तर देत शरद पोंक्षे यांनी उदय धुरत यांना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान शरद पोंक्षे सादर करत असलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे केवळ ५० प्रयोग करणार आहेत. लोकांचा आग्रह होता म्हणून त्यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचा निर्णय घेतला होता. उदय धुरत आणि शरद पोंक्षे यांचा हा वाद सामंजस्याने मिटेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. पण एक कलाकार म्हणून हे नाटक सर्वांनी केलं तरी काही हरकत नाही असे मत शरद पोंक्षे यांनी मांडले आहे.