मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून घर खरेदी करण्याचा सपाटा सुरू झालेला आहे. प्राजक्ता माळी हिने कर्जतमध्ये तर कोटींच्या घरात असलेलं आलिशान फार्महाऊस खरेदी करून अवघ्या प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. अर्थात तिने हे फार्म हाऊस एक इन्कम सोअर्स म्हणून खरेदी केलं असलं तरी सर्वात महागडं फार्महाऊस खरेदी करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. याचा मराठी माणसांना अभिमान आहे. प्राजक्ता माळी नंतर राधा सागर, ऋतुजा बागवे, पूजा पुरंदरे यांनीही स्वतःचे घर खरेदी केल्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळाला.
तर महागड्या गाड्या खरेदी करणारी सई ताम्हणकर हिनेही आता स्थिरस्थावर व्हावे म्हणून मुंबईत स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. सई पाठोपाठ मुंबई स्वतःच्या हक्काचं घर असावं आहि इच्छा बाळगणाऱ्या धनश्री काडगावकर हिने नुकत्याच आपल्या मुंबईतील नव्या फ्लॅटचा ताबा घेतला. स्वप्न पूर्ण होतात या विश्वासावर धनश्रीने मुंबईत घेर घेण्यासाठी प्रयत्न केले होते. तिच्या या प्रयत्नांना कामाची साथ तर मिळालीच शिवाय ध्येय असलं की ती स्वप्न सत्यातही उतरतात हे तिने सिद्ध करून दिलं आहे. धनश्री काडगावकर ही गेले काहीच वर्षे झाले या मराठी इंडस्ट्रीत दाखल झाली आहे. चिठ्ठी हा तिची प्रमुख भूमिका असलेला पहिलाच मराठी चित्रपट ठरला होता. पण धनश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली ती तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे.
धनश्रीने या मालिकेतून खलनायिकेची भूमिका गाजवली होती. मधल्या काळात पहिल्या अपत्याची चाहूल लागताच धनश्रीने मालिकेतून काढता पाय घेतला होता. पण त्यानंतर तू चाल पुढं या मालिकेतून तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. धनश्री पुण्याला तिच्या कुटुंबासोबत राहत असे, शुटिंगनिमित्त तिला मुंबई पुणे असा सतत प्रवास करावा लागत असे. शिवाय मुलगा कबिरला देखील सतत असं सोडून येऊन काळजावर दगड ठेवून काम करावे लागत होते. यावर पर्याय म्हणून मुंबईत घर घेण्याचा तिने विचार केला. तिच्या या निर्णयाला नवऱ्याचीही तेवढीच साथ मिळाली. आणि म्हणूनच धनश्री मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेऊ शकली.