तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहवरील मालिकेत शुभंकरची एन्ट्री झाल्यापासून नवनवीन घडामोडी घडत आहेत. शुभंकर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड आहे आणि पिहू त्याचीच मुलगी आहे हे सत्य मोनिकाने मल्हारपासून लपवून ठेवले आहे. आता स्वराज मुलगा नसून मुलगी आहे हे मोनिकाने उघड केले आहे. मात्र स्वरा हीच शुभंकरची मुलगी आहे हे ती पटवण्याचा प्रयत्न करत आहे. शुभंकरने हॉस्पिटलमधुन डीएनए रिपोर्ट मागवला त्यात स्वराच त्याची मुलगी असल्याचे त्याला कळले.
पण हा रिपोर्ट बदलण्यासाठी मोनिकाने पिहुचे रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याने शुभंकर आता स्वराला त्याच्यासोबत घेऊन जायला तयार झाला आहे. एवढे दिवस स्वराचा लळा लागल्यामुळे मल्हारला मात्र स्वराला असे अचानक सोडून जाताना पाहून तो खूप भावूक झाला आहे. स्वराला सर्वजण निरोप द्यायला तयार होतात तेवढ्यात मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. एवढा वेळ शांत असलेली मंजुळा तिचा हुकमी एक्का बाहेर काढणार आहे. मोनिका आणि शुभंकरची प्रेमपत्र मल्हारसमोर दाखवत ती मोनिकाचं सत्य बाहेर काढणार आहे. मिनिका हीच शुभंकरची गर्लफ्रेंड होती आणि पिहुच त्यांची मुलगी आहे हे मल्हारला समजते.
सत्य समजताच मल्हार आता कुठले पाऊल उचलतो यावर प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा आहे. या ट्विस्टमुळे मल्हारला मोनिकाचं सत्य उलगडणार की ती यावर आणखी काही उपाय शोधणार हे येत्या काही एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दरम्यान स्वरा शुभंकर सोबत अमेरिकेत जायला निघाली आहे. ती जर अमेरिकेत गेली तर मालिकेचे कथानक पूर्णपणे बदलून जाईल. अर्थात जर मालिकेला लीप घ्यायचा असेल तर हा ट्विस्ट योग्यच म्हणावा लागेल. आता लेखक कथानकाचा कसा कायापालट करतात हे त्यांच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास तरी या ट्विस्टमुळे मल्हारला सत्य समजेल अशी अपेक्षा करूयात.