बालकलाकार, गायक ते चित्रपट दिग्दर्शक अशा विविध भूमिकेतून सचिन पिळगावकर यांनी आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. नुकतेच सचिन पिळगावकर यांना मोहसीन-ए- उर्दू हा पुरस्कार देण्यात आला आहे. एक अस्सल महाराष्ट्रीयन ज्याची मातृभाषा मराठी आहे. त्या सचिन पिळगावकर यांनी उर्दूवरील प्रेमाखातर शहरातील सामाजिक सांस्कृतिक संस्था उर्दू मरकझचा मोहसिन-ए-उर्दू म्हणजेच उर्दूचा ब्रँड आंब्यासिडर हा पुरस्कार मिळवला आहे. उर्दू मरकझचे संचालक झुबेर आझमी म्हणतात की, मला अजून एक महाराष्ट्रीयन सापडला ज्याची मातृभाषा मराठी आहे, पण तो उर्दू अस्खलितपणे बोलतो. तो उर्दूचा राजदूत आहे कारण तो त्यासाठी जगतो, बोलतो.
सचिन पिळगावकर यांचे उर्दूवरील प्रेम त्यांच्या बोलण्यातूनच जाणवते. दीदा-ओ-दानिष्ता, खुशगवार, जाफा, वफा यासारखे उर्दू शब्द ते आपल्या संभाषणात वापरतात. खरं तर त्यांचे हे उर्दू प्रेम बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांच्यामुळे जोपासले गेले होते. मीना कुमारी जुहूला राहत तेव्हा सचिन पिळगावकर लहानपणी उर्दू शिकण्यासाठी जात असत. या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केल्याबद्दल सचिन पिळगावकर म्हणतात की, भाषेला कोणताही धर्म नसतो. उर्दू ही एकट्या मुस्लिमांची भाषा आहे असे म्हणणे चुकीचे आहे. ती भारताची आहे आणि ती आपल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशात सामील झाली आहे. सचिन पिळगावकर उर्दू भाषा कशी शिकले याबदल त्यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. १९६७ च्या मझली दीदी चित्रपटावेळी सचिन पिळगावकर ९ वर्षांचे होते.
मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. मीना कुमारीला सचिनजी खूप आवडू लागले. एके दिवशी त्यांनी सचिनजींना घरी बोलवले. सचिन मीना कुमारी यांना “मीना आपा” म्हणून हाक मारत तेव्हा त्या सचिनला “सचू बाबा” असे म्हणत. मीना आप्पांनी माझ्या पालकांना सांगितले की सचिन आठवड्यातून चार दिवस उर्दू शिकण्यासाठी माझ्या घरी येईल. तेव्हा मी त्यांच्याकडे भाषेतील बारकावे आणि शब्दलेखन शिकलो. मीना कुमारी यांचे मूळ नाव महजबीन बान. तखलूस नावाने त्यांनी कविता लिहिल्या आहेत, असे सचिन पिळगावकर सांगतात. एक अभिनेता म्हणून उर्दूने त्यांना किती मदत केली? या प्रश्नावर सचिनजी म्हणतात की, जर उर्दू माझ्या आयुष्यात आली नसती तर मी अपूर्ण राहिलो असतो. फक्त अभिनयच का, ही सुंदर भाषा कशी बोलायची हे मी शिकलो नसतो तर मी एवढा आत्मविश्वासु कधीच नसतो, असे ते म्हणतात.