मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरवरून जात असताना अनेकांना जास्तीचा टोल आकारला असे अनुभव आले असतील. लोणावळा येथे काही काळ थांबल्यानंतर हा टोल पुन्हा कट केला जातो असे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कितीही संताप व्यक्त केला तरी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिनेही यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता. कलाकारांना मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला अनेकदा प्रवास करावा लागतो. एकाच महामार्गावरून जात असताना तुम्हाला दोनदा टोल भरावा लागतो हे कशासाठी?
अशा सर्वसमान्यांच्या प्रश्नाला तिने वाचा फोडली होती. मात्र प्रशासनाचे याकडे गांभीर्याने लक्ष नाही याची प्रचिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली आहे. अभिनेते, गीतकार किशोर कदम यांनीही नुकताच हा अनुभव घेतला आहे. संताप व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. किशोर कदम याबद्दल म्हणतात की, मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवेवर २४० रुपये टोल घेतात. मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात?
अरे लूट थांबवा रे ही. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत? किशोर कदम यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी समर्थन दर्शविले आहे. आम्हालाही असे अनुभव आल्याचे दाखले त्यांना मिळत आहेत. टोल नाक्यावरच्या या भोंगळ कारभारावर शासनाने लक्ष घालायला हवे. कित्येकदा प्रवासात क्षणभर विश्रांती घेण्यासाठी प्रवासी लोणावळ्यात काही काळ थांबत असतात. मात्र अवघ्या काही वेळेच्या फरकातच तुम्हाला दुसरा टोल भरावा लागतो. टोल कट झाला हे तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचल्यावरच तास दोन तासांनी समजतं. त्यामुळे ही शुद्ध फसवेगिरी आणि लूट चालू आहे अशी संतप्त प्रतिक्रिया या घटनेबाबत दिली जात आहे. या अशा लुटीला कोण जबाबदार आहे असा प्रश्न किशोर कदम यांनी विचारला आहे.