दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या भावनेने त्यांनी आठ चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. त्यापैकी चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता सुभेदार हा त्यांचा आगामी चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अगोदर हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र गदर, आणि ओएमजी २ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा ही भावना प्रेक्षकांची देखील आहे.
त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना आजवर भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सुभेदार चित्रपटासाठीही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे अनेकजण २५ ऑगस्टकडे डोळे लावून आहेत. अशा ऐतिहासिक चित्रपटांमुळे त्यातील कलाकारांना चाहत्यांकडून अद्वितीय अनुभव येत असतात. अशातच एका अज्ञात चाहत्यांने या कलाकारांना एक सुखद अनुभव मिळवून दिला आहे. दिग्पाल लांजेकर आणि त्यांची टीम पुण्याहून मुंबईला जात होती. इथेच त्यांना एक विलक्षण अनुभव मिळाला. या अनुभवाबद्दल दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले आहे की, कधी कधी आपण केलेल्या कामाची विलक्षण पावती मिळते. आज पुण्याहून मुंबई ला जात असताना फूड मॉल वर थांबलो. नाश्ता होईपर्यंत अचानक गोड शिऱ्याच्या डिशेस सर्व्ह केल्या गेल्या.
आम्ही हे ऑर्डर केलं नाही हे म्हणेपर्यंत स्वतः मॅनेजर आला आणि त्यानं कुणीतरी हे तुमच्यासाठी ऑर्डर केलं आहे असं हसतमुखानं सांगत ही छोटीशी चिठ्ठी हातात ठेवली. त्यावरचा अगदी मनापासून लिहिलेला हा साधा सरळ संदेश वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं. कुणा अज्ञात मावळ्याचं हे प्रेम, आज मी हे केलं ते केलं म्हणून श्रेय घेण्यासाठीची धडपड मी अनेकदा पाहिली आहे. अशावेळी प्रेम व्यक्त करुन त्याचं समाधान मनात घेऊन समोरही न येणारी ही व्यक्ती चेहरा नसतानाही मनात कायम घर करुन राहील. त्यांच्या या बळ वाढवणाऱ्या अनाम प्रेमाचे आभार सामाजिक माध्यमातून मानतो आहे कारण ते त्यांच्यापर्यंत पोचतील याची खात्री आहे. तुम्ही रसिक मायबाप श्रीशिवराजअष्टक पूर्ण करण्यासाठी असेच पाठीशी उभे राहाल ही खात्री आहे, जय शिवराय.