सैराट चित्रपटामुळे नागराज मंजुळे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाअगोदर त्यांनी पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री सारखा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवला होता. या दोन्ही कलाकृतींचे मोठे कौतुक झाले होते. झुंड, घर बंदूक बिरयानी या चित्रपटानंतर त्यांनी खाशाबा या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. खाशाबा चित्रपटासाठी ऑडिशन घेतल्या जात आहेत, त्यानंतर या चित्रपटाचा मुहूर्त ठरेल. तूर्तास नागराज मंजुळे यांच्या नावामागची खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेऊयात.

नागराज मंजुळे यांच्या नावामागची कहाणी ही एखाद्या चित्रपटासारखीच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण नागराज मंजुळे हे दत्तकपुत्र आहेत आणि ते शाळेतही त्यांचंच नाव लावत होते. त्यांचं खरं नाव नागराज पोपटराव मंजुळे असं आहे. पण प्रसिद्धी मिळवण्याअगोदर ते नागराज बाबुराव मंजुळे असं नाव लावत होते. याचे कारण त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. नागराज मंजुळे म्हणतात की, माझ्या वडिलांनी मला माझ्या मोठ्या काकांना दत्तक म्हणून दिलं होतं. बाबुराव हे त्यांचं नाव, काकांनी मला दत्तक घेतल्यामुळे माझं कायदेशीर नाव नागराज बाबुराव मंजुळे असं आहे. शाळेत असल्यापासून मी त्यांचंच नाव लावत होतो.

एकदा माझी कविता नियतकालिकेत छापण्यात आली त्यावेळी मी फक्त नागराज मंजुळे एवढेच नाव दिले होते. हे नाव पाहून माझ्या वडिलांनी काकांचं नाव लावण्याची सक्त ताकीदच दिली होती. तू काकांचं नाव लावलं पाहिजे, बाबुराव हे नाव टिकून राहायला हवं एवढी त्यांची इच्छा असावी असं मला त्यावेळी वाटू लागलं. तेव्हापासून मी नावापुढे काकांचं नाव लावू लागलो. पण मी मनात पक्कं ठरवलं होतं की जेव्हा कधी मी मोठं काही काम करेल तेव्हा मी वडिलांचे पोपटराव हेच नाव लावणार. अपघाताने मी या सिनेमा इंडस्ट्रीत आलो आणि माझं नाव झालं. त्यामुळे मी आता माझ्या नावापुढे माझ्या वडीलांचंच म्हणजेच नागराज पोपटराव मंजुळे असंच नाव लावतो.