अभिनेत्री भार्गवी चिरमुले सध्या अभिनय क्षेत्रासोबतच युट्युबच्या माध्यमातून मुलाखत घेण्याचे काम करते आहे. नुकतीच तिने शरद पोंक्षे यांची मुलाखत घेतली होती. तर मैत्री दिनानिमित्त माहोल मुलींसोबत युट्युबवर एक दिलखुलास मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सई रानडे हिने एक धक्कादायक खुलासा केलेला पाहायला मिळाला. सई रानडे, समिधा गुरू, मृणाल देशपांडे आणि भार्गवी चिरमुले या चौघींची खूप छान मैत्री आहे. माहोल मुली म्हणून विदर्भाच्या भाषेची मजा या चौघीही सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.
भार्गवीने सई सोबत वहिनीसाहेब या मालिकेतून काम केले होते, तेव्हापासून या दोघींची खूप चांगली मैत्री आहे. मात्र या मालिकेत काम करत असताना सईने तिचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. सई या मुलाखतीत म्हणते की, मी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कलाकारांनी मला त्रास दिला. यात भार्गवी मुळीच नव्हती. पण ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यामुळे मी खूपच नैराश्येत वावरत होते. एवढं की मला ही इंडस्ट्रीच सोडून जावे असे वाटत होते. मी कोणाशी मैत्री करायलाही खूप घाबरत होते. माझंच काहीतरी चुकतंय असं मला वाटत होतं. त्या लोकांपासून मी लांब जायचा प्रयत्न करत होते, पण कालांतराने माझी भार्गवी सोबत मैत्री झाली. यादरम्यान माझं कुटुंब, माझा नवरा आणि माझ्या जवळच्या काही मित्रांमध्येच मी रमत होते.
ही इंडस्ट्री सोडून जावून आपलं आपलं काम करावं असं वाटत होतं. पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर मी गेले तेव्हा मोठमोठे कलाकार तिथं काम करत होते. इथे आपल्याला नीट काम करायला हवं नाहीतर पुन्हा रॅगिंग होईल अशी मनात सतत भीती होती. असा धक्कादायक खुलासा सईने या मुलाखतीत केला आहे. सई रानडे हिने तिच्या कारकिर्दीत बऱ्याचदा खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. वहिनीसाहेब, रुंजी, कुलवधू, देवयानी अशा मालिकांमधून ती विरोधी भूमिकेत दिसली. त्यामुळे सईला प्रेक्षकांच्या टीकेला नेहमीच सामोरे जावे लागले आहे. मराठीसह सईने हिंदी भाषिक मालिकांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सई सोनी टीव्हीच्या बरसातें या हिंदी मालिकेत झळकत आहे. हिंदी सृष्टीत तिला खूप प्रेमही मिळत आहे.