Breaking News
Home / मराठी तडका / शरद पोंक्षे यांची लेक पायलट झाली.. तिकडे किरण माने यांनी दिल्या कानपिचक्या
marathi actor kiran mane
marathi actor kiran mane

शरद पोंक्षे यांची लेक पायलट झाली.. तिकडे किरण माने यांनी दिल्या कानपिचक्या

शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पोंक्षे हिने पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले. आर्थिक संकट असताना आणि कुठले आरक्षण नसताना आपल्या लेकीने हे यश मिळवले असे शरद पोंक्षे यांनी म्हटले होते. मात्र ही गोष्ट अनेकांना खटकली. तर किरण माने यांनी सुद्धा कानपिचक्या देणारी पोस्ट लिहिली. त्यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात की, पोरी नव्या जगात नवी उड्डाणं घे. तुझ्या करीयरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील. मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील.

kiran mane mahatama gandhi
kiran mane mahatama gandhi

घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय. ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनमेंदूला बसणार्‍या हादर्‍याची आत्तापासून तयारी कर. जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल. जाशील त्या गांवात तुला बापूजींचा पुतळा दिसेल! ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल. सुरीनाम, पोलंड, कोरीया जाशील तिथे गांधी, गांधी आणि गांधीच असेल. अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल!गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील. हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल.

kiran mane dr babasaheb ambedkar
kiran mane dr babasaheb ambedkar

अमेरीकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल. लंडनला सर्वांगसुंदर डाॅ भिमराव रामजी आंबेडकर मेमोरीयल दिसेल ! हंगेरीला डाॅ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील. कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डाॅ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत ते ही पहाशील. लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डाॅ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल. या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील! ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं.

त्यांना हे सांगू नकोस की मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत. अजिबात सांगू नकोस हे, कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या, घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त माणूस दिसेपर्यन्त विचार करत रहा ! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करीयर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात, धर्म, वंश, देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात. तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी. तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!  किरण माने.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.