ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. तळेगाव दाभाडे येथील भाड्याच्या घरात ते राहत होते. पण घरातून वास आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले त्यावेळी घराचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांच्या निधनाची बातमी उघड झाली होती. रविंद्र महाजनी यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले असे शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आले. या अहवालात त्यांच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र एकीकडे त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त होत असताना दुसरीकडे गश्मीरवर ट्रोलर्सनी निशाणा साधलेला पाहायला मिळतो आहे.
रविंद्र महाजनी सात ते आठ महिने एकटेच कसे राहत होते? गश्मीर वडिलांना पाहत नव्हता का, त्यांची विचारपूस करत नव्हता का? तीन दिवस झाले तरी मुलगा वडिलांना फोन करत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. यातून गश्मीरवर टीका सुद्धा केली गेली. मात्र नुकतेच गश्मीरने यावर मौन सोडलेलं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर गश्मीरने एक इंस्टा स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तो टीकाकारांना योग्य वेळ आली की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल असे म्हणतो आहे. या पोस्टमध्ये गश्मीर म्हणतो की, “ते स्टार होते आणि त्यांना तसच राहुद्या, मी आणि माझे सहकारी गप्प आहोत. जर तुमच्याकडून द्वेष आणि शिवीगाळ केली जात असेल तर कुठल्याही गोष्टींपेक्षा आम्ही त्याचे स्वागत करू. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, ओम शांती.
ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे ते पती होते आणि आम्ही त्यांना तुमच्यापेक्षा जास्त चांगले ओळखतो. कदाचित भविष्यात योग्य वेळ येईल तेव्हा मी या गोष्टींचा लवकरच उलगडा करेल”. असे म्हणत गश्मीरने त्याच्यावर होत असलेल्या टिकेवर उत्तर दिलं आहे. तुमच्या मनातील प्रश्नांवर मी योग्य वेळ आली की उत्तर देईल असे गश्मीर यावेळी ट्रोलर्सना म्हणतो आहे. दरम्यान गश्मीर खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच तो एक माणूस म्हणूनही चांगला आहे अशी प्रतिक्रिया हेमांगी कवीने दिली होती. तो एक उभारता आभिनेता आहे आणि अशा गोष्टीवर चर्चा केल्याने त्याच्या स्टारडमला गालबोट लागेल असे तिने टीकाकारांना म्हटले होते. दरम्यान गश्मीर त्याच्यावर होणाऱ्या टिकेवर काय खुलासा करतो यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.