बाईपण भारी देवा चित्रपटाच्या निमित्ताने सुकन्या कुलकर्णी या प्रकाशझोतात आलेल्या आहेत. एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून त्यांना ओळख मिळाली आहेच पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उत्तम व्यक्तिमत्व म्हणूनही त्या ओळखल्या जातात. त्यांची ही दुसरी बाजू अनेकांना अपरीचयाची आहे. खरं तर या हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळू नये असे म्हटले जाते. मात्र जिथे मराठी कलाकार कोणासाठी काय करतात? असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा ही उदाहरणं त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवीत, जेणेकरून मराठी कलाकारांच्या बाबत अशी ओरड पाहायला मिळणार नाही. मराठी सृष्टीतील निशिगंधा वाड यासुद्धा अशाच एका मोठ्या कार्यात सहभागी झालेल्या आहेत.
सुकन्या कुलकर्णी यांचीही ही बाजू प्रेक्षकांना माहिती नाही. पण नुकत्याच एका कार्यक्रमात सुकन्या कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण दिलेलं पाहायला मिळालं. त्या दरवर्षी एका मुलाला दत्तक घेऊन त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळतात. ही गोष्ट खरी आहे असे अधोरेखित करताना त्या म्हणतात की, “आमच्या आईवडिलांनी आम्हा मुलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. आमच्या कमाईतून मिळणारे पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे हे मी त्यांच्याकडे पाहूनच शिकलेली आहे. आपल्या कमाईतील काही रक्कम मी देवस्थानासाठी देते तर काही रक्कम मी एनजीओ सारख्या गरजू संस्थांना देते. अशा माध्यमातून मी अनेक संस्थांशी जोडली गेलेली आहे. काही एनजीओ संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. अशा संस्थांना मी नेहमी शक्य तेवढी मदत करत असते.
सुकन्या कुलकर्णी यांची ही बाजू जाणून अनेकांनी त्यांच्या कार्याचं मोठं कौतुक केलं आहे. सुकन्या कुलकर्णी या बालमोहन शाळेत शिकल्या. त्यामुळे शाळेतल्या शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांच्याशी त्यांचे सख्य तयार झाले आहे. विद्याताई पटवर्धन यांनी आजवर त्यांच्या शाळेतील मुलांना अभिनयाचे धडे देऊन मराठी इंडस्ट्रीत मोठी संधी मिळवून दिली होती. मात्र वयोपरत्वे विद्याताई पटवर्धन या आता आजारपणामुळे अंथरुणाला खिळुन आहेत. त्यांच्या मदतीला बालमोहन शाळेतील शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आर्थिक मदत उभी केली आहे. अशातच सुकन्या कुलकर्णी यासुद्धा विद्याताईंच्या मदतीला वेळोवेळी धावून येत असतात. सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री अशी त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळे त्यांचं मोठं कौतुकही केलं जात आहे.