गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीने वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. त्यातील बहुतेक मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवलेली दिसत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा, नवा गडी नवं राज्य, तू चाल पुढं, यशोदा, लोकमान्य या मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले. तर काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला खुपते तिथे गुप्ते हा शो देखील प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. पण आता या वाहिनीवर लवकरच एक नवा शो दाखल होणार आहे. त्यामुळे झी मराठीच्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे.

निरोप घेणारी ही मालिका आहे लोकमान्य. लोकमान्य मालिका गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेत स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतेच या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार केलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर या मालिकेने बऱ्याच वर्षांचा लीप घेतलेला दिसून येतो. या लिपमुळे मालिकेत अनेक नवीन पात्रांची एन्ट्री करण्यात आलेली आहे. मात्र आता प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. दशमी क्रिएशन्स निर्माते नितीन वैद्य यांनी याबाबत आपला संताप व्यक्त केला आहे. याअगोदर त्यांनी सावित्रीजोती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. मात्र पुरेसा प्रतिसास न मिळाल्याने या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागला होता.

त्यानंतर लोकमान्य या ऐतिहासिक मालिकेबाबतही तेच घडत असल्याने नितीन वैद्य यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तम सादरीकरण आणि मालिकेचा दर्जा राखून ठेवला असला तरी आता वाहिनीने मालिका बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे इथून पुढे आता कोणतेही ऐतिहासिक मालिका करायची असेल तर ठराविक भागांपूर्तीच ती मर्यादित ठेवण्यात येईल याचा निर्णय घ्यावा लागेल. तेवढ्या भागांपुरताच वाहिनीशी करार करू असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान लोकमान्य मालिका वास्तवाला धरून असावी यावर आम्ही खूप मेहनत घेतली होती. पण पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने वेळेअगोदरच मालिकेला निरोप घ्यावा लागत आहे यामुळे नितीन वैद्य यांनी नाराजी व्यक्त केली आहे.