मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या एक ते दोन पिढ्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. मग आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची मुलं देखील याच क्षेत्रात येण्याचे धाडस करतात. आज मराठी सृष्टीतील सख्ख्या बहिणी कोण आहेत ते जाणून घेऊयात..
१. रेणुका दफ्तरदार आणि देविका दफ्तरदार- नाळ चित्रपटाची नायिका साकारली होती अभिनेत्री देविका दफ्तरदार हिने. नितळ, देवराई, अस्तू, संहिता, नागरिक अशा अनेक दर्जेदार चित्रपटात देविकाने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. देविका दफ्तरदार यांची थोरली बहीणही प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिच्या सख्ख्या बहिणीचे नाव आहे “रेणुका दफ्तरदार”. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) मधील “शास्त्र असतं ते…” म्हणणारी लोकप्रिय आई रेणुका दफ्तरदार यांनी त्यांच्या अभिनयातून चांगलीच गाजवली आहे. भाडीपाची निर्मिती असलेल्या ‘आई, बाप्पा आणि मी’ या व्हिडिओला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता त्यानंतर ‘आई ,मी व प्रायव्हसी’ या त्यांच्या दुसऱ्या व्हिडिओला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. भाडीपाच्या अनेक मालिकांमधून रेणुका यांनी चाहत्यांच्या मनात आईची एक वेगळी ओळख निर्माण केली. सोनाली कुलकर्णीसोबत “दोघी” या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात रेणुका यांनी गौरीची भूमिका साकारली होती. घो मला असला हवा, दहावी फ, बाधा, विहीर, कैरी अशा विविध धाटणीच्या चित्रपटातून त्यांनी तितक्याच ताकदीच्या भूमिका आपल्या अभिनयाने चांगल्याच गाजवल्या आहेत.
२. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे- मन फकिरा, नटसम्राट, बोगदा, कट्यार काळजात घुसली, फर्जंद, फत्तेशीकस्त अशा अनेक चित्रपटातून अभिनेत्री मृण्मयीने मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. खरं तर मृण्मयीची आई आणि आईचे वडील दोघेही रंगभूमीवरचे कलाकार त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मृण्मयी पाठोपाठ तिची सख्खी बहीण गौतमीचे देखील अभिनय क्षेत्रात आगमन झाले. सारे तुझ्याच साठी ही तिने अभिनित केलेली पाहिच मराठी मालिका मात्र झी मराठीवरील माझा होशील ना मालिकेमुळे गौतमीला प्रसिद्धी मिळाली. अभिनयासोबतच गौतमीला गाण्याची देखील आवड आहे. या मालिकेतून तीने आपल्या आवाजात काही गाणी गायली आहेत.
३. सुप्रिया पाठारे आणि अर्चना नेवरेकर – अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी फु बाई फु मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. जागो मोहन प्यारे, ची व चि सौ कां, मोलकरीण बाई, श्रीमंता घरची सून अशा मालिका चित्रपटातून त्या नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिल्या आहेत. अभिनेत्री अर्चना नेवरेकर ही सुप्रिया पाठारे यांची सख्खी बहीण आहे. अर्चना नेहमी आपल्या बहिण सुप्रियासोबत चित्रीकरणाच्या सेटवर जायची यातूनच तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. वहिनीची माया, सुना येती घरा अशा अनेक चित्रपटातून अर्चना एक नायिका सह नायिका बनून प्रेक्षकांसमोर आली. सध्या अर्चना अभिनय क्षेत्रात कार्यरत नसली तरी “संस्कृती कालादर्पण” ची ती अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. दरवर्षी या संस्थेमार्फत कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलाकारांना पुरस्कार देण्यात येतात.
४. मृणाल देशपांडे आणि समिधा गुरू – शुभमंगल ऑनलाइन मालिकेत ऐश्वर्याचे पात्र साकारले आहे अभिनेत्री “समिधा गुरू” हिने. समिधा ही मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनियाचा उंबरा या मालिकेतून तिने मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. अवघाची हा संसार, देवयानी, कमला, तुजविण सख्या रे, गंध फुलांचा गेला सांगून , अनाहूत, क्राईम पेट्रोल ,पन्हाळा, तुकाराम, लाल ईश्क, कापूस कोंड्याची गोष्ट सारख्या चित्रपट आणि मालिकांमधून ती कायम प्रेक्षकांसमोर येत राहिली आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतला केड्या म्हणजेच अभिनेता, लेखक ‘अभिजित गुरू’ हा समिधाचा नवरा आहे तर समिधाचे वडील ‘सुरेश देशपांडे’ हे नाट्य- चित्रपट लेखक, दिग्दर्शक तसेच तिची आई ‘मीना देशपांडे’ या प्रसिद्ध कथ्थक अलंकार, नृत्य शिक्षिका तसेच नाट्यअभिनेत्री त्यामुळे नृत्याचा आणि कलेचा वारसा तिला घरातूनच मिळत गेला.
प्रसिद्ध अभिनेत्री “मृणाल देशपांडे” ही समिधाची सख्खी थोरली बहीण आहे हे कित्येकांना माहीत नसावे. पुढचं पाऊल, छत्रीवाली, अग्निहोत्र या मालिकांमधून मृणाल देशपांडे यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. नाट्य निर्माते चंद्रकांत लोकरे हे मृणाल देशपांडे यांचे पती आहेत. त्यांनी नांदी, नटसम्राट अशा नाटकांची निर्मिती केली आहे.
५. पद्मश्री जोशी आणि पल्लवी जोशी – चंपा चमेली की जाई अबोली… हे गाणं नणंद भावजय या मराठी चित्रपटातल. अभिनेत्री पद्मश्री जोशी- कदम यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. अभिनेते विजय कदम यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. तर प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी ही पद्मश्रीची सख्खी बहीण आहे. त्यांचा भाऊ अलंकार जोशी हिंदी सृष्टीतला एकेकाळचा बालकलाकार म्हणून ओळखला जातो. अनेकदा अमिताभ बच्चनच्या बालपणीची भूमिका अलंकारने साकारली होती. काही मोजक्या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. तर पल्लवीने देखील अनेक हिंदी चित्रपटतातून बालकलाकार म्हणून काम केले होते. एक नायिका ते निर्माती असा तिचा प्रवास सुरु आहे. पद्मश्री, पल्लवी आणि अलंकार हे तिघेही मराठी चित्रपट सृष्टीचा एक महत्वाचा भाग बनले आहेत हे मराठी प्रेक्षक कधीही विसरणार नाही.