आपलं नशीब कधी उजळेल हे कोणालाच सांगता येत नाही. असाच काहीसा अनुभव तिरुअनंतपुरमच्या अनुपने घेतला आहे. ३० वर्षांचा अनुप गेल्या अनेक वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच ओनम लॉटरीचे तिकीट खरेदी केल्यामुळे त्याला तब्बल २५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. बातमी जाहीर झाल्यावर अनुपवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. संपूर्ण देशात अनुपचा फोटो अतिशय व्हायरल झाला. अनुप आपल्या कुटुंबासोबत बँकेकडून कर्ज घेऊन मलेशियाला राहायला जाणार होता. पुढे तिथेच तो शेफ बनून काम करण्याचा त्याचा मानस होता. बँकेकडून कर्ज मंजूर झाले त्याच दिवशी अनुपला २५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे समजले होते.
अनुपने बँकेकडून घेतलेले कर्ज बँकेला परत देऊ केले. लॉटरीमुळे अनुपने मलेशियाला जाण्याचा निर्णय त्याने मागे घेतला. भारतातच राहून स्थिरस्थावर होऊ असा विचार त्याच्या मनात आला. मात्र अनुपला आता या लॉटरीचा पश्चाताप होऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. अनुपला लॉटरी लागली हे कळल्यावर त्याच्या मित्रांनी नातेवाईकांनी अनुपची भेट घेतली. सर्वांनी अभिनंदनही केले मात्र काही मित्रमंडळी त्याच्याकडे या लॉटरीतून हिस्सा मागायला लागले आहेत. मुळात आपल्या लेकीची पिगीबँक फोडूनच अनुपने हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तो लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहे. पण यावेळी मात्र त्याचे नशीबच फळफळलेले दिसून आले. अनुपला लॉटरी लागली हे सोशल मीडियावर व्हायरल झाले.
आता आपल्या मुलीसोबत त्याला बाहेर खेळायला देखील जाणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे अनुप त्याच्या कुटुंबासोबत नातेवाईकांच्या घरी राहायला गेला आहे. सोशल मीडियावर त्याने आपली ही व्यथा मांडली आहे. मला जर दुसरे किंवा तिसरे बक्षीस मिळाले असते तर खूप बरे झाले असते असे तो म्हणतो आहे. ओनम लॉटरी मध्ये दुसऱ्या क्रमांकाला ५ कोटी आणि तिसऱ्या क्रमांकाला १ कोटीचे बक्षीस मिळाले. मात्र या २५ कोटींच्या लॉटरीमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा अनुपला त्रास होऊ लागला आहे. अगदी घरातून बाहेर पडणे कठीण झाल्याची खंत व्यक्त केली आहे. अनुपला २५ कोटींमधून १६ कोटी २५ लाख एवढी रक्कम मिळणार आहे. मात्र या प्रसिद्धीचा कुठेतरी अतिरेक होऊ लागल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला देखील हा त्रास सहन करावा लागत आहे.