५२वा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोवा येथे संपन्न होणार असून, जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण कथांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट यामध्ये प्रदर्शित होतात. सुवर्ण मयूर उत्सवात यावर्षी तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव आणि निखिल महाजन यांचा गोदावरी या दोन चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित सिनेमात मुख्य भूमिका त्यांचा नातू राहुल देशपांडे यांनी साकारली आहे.
वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नव्हे, दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वार सारखी आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. पुल देशपांडे यांचे हे उद्गार वसंतरावांच्या सुमधुर गायकीबद्दल सर्व काही सांगून जातात. वसंतराव हे शास्त्रीय संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक तसेच मराठी संगीत रंगभूमीवरील नावाजलेले अभिनेते. गायकीवर तसेच तबला आणि हार्मोनिअम या वाद्यांवर त्यांचा हातखंडा होता. शास्त्रीय संगीतात जबरदस्त गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्यांत मानाचे स्थान असलेले. त्यांनी आपल्या गायकीनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविले. कारकिर्दीच्या सुरवातीचे दोन दशके नोकरी करीत संगीताची उपासना सुरु ठेवली. त्यांनी गुळाचा गणपती, अष्टविनायक, पेडगावचे शहाणे, अवघाची संसार, दूधभात यासारख्या शेकडो चित्रपटांसाठी पार्श्वगायन तसेच अभिनय साकारला. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाच्या खानसाहेब या भूमिकेने नावलौकिक मिळाला. तुकाराम, वीज म्हणाली धरतीला, हे बंध रेशमांचे, मेघ मल्हार तसेच वाऱ्यावरची वरात ही नाटके विशेष गाजवली.
पुण्यात वास्तव्याला असताना त्यांना पुल देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी आणि बेगम अख्तर अशा दिगज्जांचा सहवास लाभला. दैदिप्यमान जीवनप्रवास प्रेक्षकांना अनुभवता यावा यासाठी दर्शन देसाई आणि चंद्रशेखर गोखले यांनी निर्मिती तर निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आपल्या आजोबांच्या बायोपिक चित्रपटात राहुल प्रमुख भूमिकेत आहेत तर मराठी सृष्टीतील कौमुदी वालोकर, अनिता दाते, पुष्कराज चिरपूटकर आणि अमेय वाघ या जाणत्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका पहायला मिळणार आहेत. तर आरुष नंद या बाल कलाकाराने वसंतरावांच्या बालपणीचे किरदार निभावले आहे.