बाप लेकाच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा बाप ल्योक चित्रपट १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एक आठवडा उलटल्यानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. एकीकडे आपला चित्रपट थिएटरमध्ये चालतोय त्याच्या दुसऱ्याच बाजूला आपण खऱ्या आयुष्यात बाप झालो हा योगायोग अभिनेत्याला सुखावणारा ठरला आहे. मुलींच्या पाठीवर मुलगा असावा अशी त्याची इच्छा होती. त्याची ही इच्छा आता पूर्णत्वास आली आहे.
चित्रपटातील अभिनेते विठ्ठल काळे यांनी एका मुलाचा बाप झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विठ्ठल काळे हे अभिनेते तसेच लेखक आहेत. पुनश्च हरिओम, आटपाडी नाईट्स, द मिसिंग स्टोन, कागर, एक थी बेगम, तिची कथा, राक्षस, वैमानिक अशा चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील पानगाव हे त्याचं मूळ गाव आहे. पानगाव सारख्या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या या शेतकरी कुटुंबातील कलाकाराने थोड्याच दिवसांत अभिनय क्षेत्रात यशस्वी भरारी घेतलेली पाहायला मिळाली. एमए चे शिक्षण घेण्यासाठी विठ्ठल पुण्यात आला. एमए केल्यानंतर त्याने मासकम्युनिकेशचं शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठात असताना लघुपटात काम करण्याची त्याला संधी मिळाली.
चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तुकाराम चित्रपटासाठी त्याने ऑडिशन दिली. यातूनच विठ्ठलचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. हॉटेल मुंबई या हॉलिवूड निर्मिती चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाचे शूटिंग ऑस्ट्रेलियात पार पडले होते. सहाय्यक भूमिका ते चित्रपटाचा प्रमुख नायक अशी मजल त्यांनी मारली. काडी लाव त्या चंद्राला हा कविता संग्रह त्यांनी लिहिला आहे. अशातच आता बाप ल्योक हा चित्रपट थिएटरमध्ये गाजत असतानाच त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. मुलाला हातात पकडल्यावर स्थळ, काळ, अवकाश, भवताल या सर्वांचा विसर पडतो, फक्त तू जाणवतो. तुझं स्वागत आहे, असे म्हणत विठ्ठलने त्याच्या या लेकाचे स्वागत केले आहे. विठ्ठलच्या बाप बनल्याच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.