मुंबई पुणे सारख्या कलाकारांनी मराठी सृष्टी व्यापली असली तरी या गर्दीत आता विदर्भातील तरुण मंडळी जागा मिळवताना दिसत आहेत. भारत गणेशपुरे, संकर्षण कऱ्हाडे, योगेश शिरसाट या कलाकारांची बोलण्याची हटके स्टाईल आणि विनोदाचे अचूक टायमिंग प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या यादीत आता बुलढाण्याच्या तरुणाने देखील केवळ मराठी सृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या तरुणाचे नाव आहे विश्वनाथ कुलकर्णी. मालिकेतून काम करत असताना त्याच्या अभिनयाची दखल मिळवत विश्वनाथने बॉलिवूड सृष्टीतही पदार्पण केले.
विश्वनाथ कुलकर्णी हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या छोट्याशा गावचा. कॉलेजमध्ये असल्यापासूनच विश्वनाथने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. नाटकातील त्याने साकारलेल्या लहान मोठ्या भूमिका प्रशंसनीय ठरल्या. स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेवदत्त मालिकेत त्याने भास्कर हे पात्र गाजवले. जवळपास १७५ एपिसोडमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. सोनी टीव्हीवरील मेरे साई, अबोली, क्रिमीनल्स, तू अशी जवळी रहा अशा विविध मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. सहाय्यक, खलनायक अशा विविधांगी भूमिकेत झळकलेल्या विश्वनाथने मुळशी पॅटर्न चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. काही जाहिरातींसाठी त्याने मॉडेलिंग देखील केले.
नेटफ्लिक्सचा बहुचर्चित माई आणि रुद्रा या सारख्या वेबसिरीजमधुन त्याची महत्वाच्या भूमिकेसाठी वर्णी लागली. अजय देवगण, रायमा सेन, साक्षी तन्वर या सारख्या बॉलिवूड कलाकारांसोबत काम करता आले. २०१६ पासून विश्वनाथने अभिनय क्षेत्रात स्वतःचा पाया रोवला. मालिकेतील छोट्या मोठ्या भूमिकेने त्याची प्रत्येकवेळी दखल घेतली आणि याचमुळे नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याला झळकण्याची नामी संधी मिळाली. मागील काळात विश्वनाथकडे कुठलेच काम नव्हते, मात्र त्यानंतर एक नवी उमेद घेऊन तो पुन्हा कामाला लागला. अबोली, माझी माणसं अशा मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. बुलढाण्याच्या या हरहुन्नरी कलाकाराला अभिनय क्षेत्रात असेच यश मिळो ही सदिच्छा.