कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी, त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवली होती. त्यामुळे ही कलाकार मंडळी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहेत. या मालिकेतील नायक जयसिंगचा मित्र फुकट म्हणजेच फुलचंदची भूमिका अभिनेता विश्वजित पालव याने साकारली होती. आपल्यालाही फुकट सारखा एक मित्र असावा असे त्याच्या भूमिकेकडे पाहून सगळ्यांना वाटत होते. विश्वजित पालवने ही भूमिका त्याच्या सहजसुंदर अभिनयातून सुरेख वठवली, त्यामुळेच तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
विश्वजित पालव नुकताच विवाहबद्ध झाला आहे, त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी विश्वजित आणि सानिका नाईक यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला मराठी सृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. तर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव देखील केलेला पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी विश्वजितने आपल्या प्रिवेडिंगचे फोटो शेअर केले होते, तेव्हा तो लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर झाले होते. विश्वजितने स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत ओळख बनवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या विश्वजितने कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. नाटक, एकांकिका करत त्याने विविध पारितोषिकं पटकावली.
मालवणी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्याला झी मराठीच्या गाव गाता गजाली या लोकप्रिय मालिकेत स्थान मिळवता आले. या मालिकेत त्याने प्रसादची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे विश्वजित प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. नुकत्याच आलेल्या प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. वस्त्रहरण, प्रितम, काळी माती, कॉमेडी बीमेडी, देवाक काळजी, धुमशान, लेक माझी दुर्गा अशा दर्जेदार मालिका, नाटक आणि चित्रपटातून त्याच्या भूमिकेला वाव मिळत गेला. वस्त्रहरण या नाटकातून विश्वजित वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. शबय या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय महोत्सवात द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कॉलेजमध्ये असताना अभिनयासोबतच विश्वजितने दिग्दर्शनाचे तंत्रज्ञान शिकून घेतले होते.