आज लता दिदींचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. मात्र आजही त्या आपल्यात आहेत अशी भावना त्यांच्या भावंडांनी आणि तमाम चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दिदींच्या अनेक आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. नुकतेच उषा मंगेशकर यांनी दिदींना गाजराचा हलवा खूप चांगला बनवता येत होता याची आठवण सांगितली. त्यामुळे त्या गेल्यानंतर आम्ही भावंडांनी गेल्या वर्षभरापासून गाजराचा हलवा खाणे बंद केले आहे अशी एक भावुक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदार हिने देखील त्यांच्यासोबतचा एक अविस्मरणीय असा किस्सा शेअर केला आहे.
विशाखा सुभेदार सध्या हास्यजत्रेचा भाग नाहीत मात्र या शोमध्ये घडलेला एक किस्सा त्यांनी अधोरेखित करत लता दीदींनी भेट म्हणून दिलेली साडी आज नेसली आहे. ह्या साडीतला एक गोड फोटो त्यांनी शेअर करताना म्हटले आहे की, आज हा फोटो माझा नाही तर ह्या मी नेसलेल्या साडीचा आहे. हे वस्त्र नाही आशीर्वाद आहे, भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांचा. आज लतादीदींचा स्मृतीदिन, हास्यजत्रे मधलं उर्दू गायिका, हे पात्र निभावलेले ते स्किट त्यांना प्रचंड आवडलं. दिदी म्हणाल्या तू उर्दू फार छान बोललीयस. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेयत, त्यांचे उच्चार अवघड असतात. तू खरंच खुप छान जमवलंस. दिदींनी नाटकात काम केलं होतं त्या वेळेस झालेली गंमत देखील सांगितली.
दीदींनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला, मागील कठीण काळ निवळला की आम्ही भेटायला जाणार होतो पण दुर्दैव, राहून गेलं. दीदी आपल्यात नाहीयत पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो! अंगाई ते म्हातारपण सगळ्या वयाशी त्यांचा आवाज, त्यांची गाणी कनेक्ट होतात. आणि त्या सर्वश्रेष्ठ बाईंचा, लतादीदींचा, आम्हाला फोन आला! त्यांनी फोनवर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत. तो दिवस न विसरण्यासारखा होता. ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होतं ते मी शब्दात नाही सांगू शकत. देवाचे आभार मानले, लताबाईंचे नाव घेतले त्यांना सांगितलं तुम्ही दिलेली साडी नेसतेय. समीर चौघुले, सचिन मोटे, सचिन गोस्वामी हास्यजत्रेचे अमित फाळकेचे सुद्धा आभार मानले. ह्या सगळ्यांमुळेच हे आशीर्वाद रुपी वस्त्र मला मिळाले.