प्रकृती खालावल्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. हृदय आणि मूत्रपिंड आजार अशा बऱ्याच समस्यांमुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. मात्र अवयव निकामी झाले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. काल ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि यातच अनेकांनी त्यांच्या निधनाची अफवा पसरवली. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर विक्रम गोखले यांच्या पत्नी वैशाली यांनी मीडियाशी संपर्क साधला आणि विक्रम गोखले व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले.
हालचाल होत नसल्याने आणि उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने ते कोमात गेले आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली होती. मात्र आज विक्रम गोखले यांच्या निधनाची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विक्रम गोखले यांच्या दोन्ही मुलींनी नाटकातून काम केलेले होते, मात्र पुढे त्यांनी या क्षेत्रात न येण्याचे ठरवले. नेहा आणि निशा या त्यांच्या दोन मुली आहेत. निशा परदेशात असून काल वडिलांना भेटण्यासाठी ती पुण्याला दाखल झाली होती. तर नेहा मुंबईतच स्थायिक असल्याने ती कालच पुण्याला आली होती. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून तिने सर्वांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. अभिनेता अजिंक्य देव यांनीही ही बातमी जाहीर केली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
माहेरची साडी चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती. विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला होता. आज्जी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलावंत. चंद्रकांत गोखले मृत्यू पश्चातही समासेवेचा वसा चालू ठेवताना पाहायला मिळाले. १९९९ साली त्यांनी कारगिल जवानांसाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. नजीकच्या काळात आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड व सदर्न कमांड पुणे यांच्याकडे तेवढेच पैसे देणगीदाखल जमा केले. त्यानंतर त्यांनी काही पैसे बँकेमध्ये मुदत ठेवीमध्ये गुंतवले.
देशाची सेवा करताकरता अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी ‘क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स’ या संस्थेला बँकेतील मुदत ठेवीच्या व्याजापोटी येणाऱ्या एक लाख रुपयांचा धनादेश दर वर्षी देण्याचा मानस केला. समाजसेवेचा हा वारसा विक्रम गोखले यांनी देखील चालवला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुण्यातील दोन एकर जमीन मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. कलाकारांना वृद्धापकाळात हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांनी ही जमीन दान केली असल्याचे सांगितले होते. विक्रम गोखले यांच्या निधनाच्या बातमीने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अशा जाण्याने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे.