पिंकीचा विजय असो या मालिकेत प्रमुख भूमिकेतील अभिनेता विजय आंदळकर तगड्या अभिनयाने घराघरात पोहचत आहे. झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकु या मालिकेत काम करत असताना सहनायिका म्हणजेच अभिनेत्री रुपाली झनकर हिच्यासोबत त्याचे प्रेम जुळले. मालिका एक्झिट घेताच दोघांनी साखरपुडा करून अनेकांना धक्काच दिला होता. कारण २०१७ साली विजय आंदळकर अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत विवाहबद्ध झाला होता. त्यांच्या या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार मंडळीनी हजेरी लावली होती.
अवघ्या काही वर्षातच त्यांच्यात दुरावा येईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे रुपाली सोबत त्याचा साखरपुडा चर्चेचा विषय ठरला. अर्थात हा त्यांचा दोघांचा सामंजस्याने घेतलेला निर्णय असल्याने या गोष्टीची वाच्यता कुठेही फारशी घडली नाही. विशेष म्हणजे या दोघांनीही आपल्या तुटलेल्या नात्याबद्दल कधी कुठे सांगितले नाही. पूजा सध्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत रुजू झाली आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिने मिस नाशिकचे पात्र गाजवले होते. साधारण वर्षभरापूर्वी विजय आणि रुपाली दोघेही विवाहबद्ध झाले होते. लग्नानंतर विजय लगेचच स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेत मुख्य भूमिका निभावताना दिसला. आता वर्षभरातच या दोघांनी आईबाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केलेली आहे.
तो किंवा ती, लवकरच पाहू, मेसेज असलेला केकचा एक फोटो शेअर करून विजयने लवकरच बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना कळवली आहे. ही बातमी पाहून मराठी सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. रुपाली झनकर हिने आम्ही बेफिकर या चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ही तिने साकारलेली पहिलीच मालिका. तर विजयने आजवर अनेक मालिका चित्रपटातून विरोधी तसेच नायकाच्या भूमिका साकारलेल्या दिसल्या. विजय आंदळकर आणि रुपाली झनकर दोघेही लवकरच आईबाबा होणार असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कलाकार इन्फोची टीम आणि रसिक प्रेक्षकांतर्फे या दांपत्याचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.