झी मराठी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा सोहळा गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. अशोक सराफ यांचा असा सन्मान होताना पाहून अनेकांना सुखद अश्रू अनावर झाले होते. आता अशाच धाटणीचा आणखी एक सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी नाट्य सृष्टीत भरीव योगदान देणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांचा हा सन्मान सोहळा असणार आहे. येत्या ९ एप्रिल २०२३ रोजी झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा झी मराठी वाहिनीवर रंगणार आहे. यावेळी नाट्यसृष्टीत भरीव योगदान देणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांचा महासन्मान होणार आहे.
आणखी एक सुखद सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक निश्चितच उत्सुक असणार आहे. यावेळी निलेश साबळेने दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकांचा गेटअप करून त्यांना मानवंदना दिलेली पाहायला मिळाली. हसवा फसवी या विनोदी नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी अफलातून भूमिका साकारली आहे. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी स्त्री भूमिका गाजवली. अशा कितीतरी भूमिकेतून दिलीप प्रभावळकर प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. चित्रपटात देखील त्यांनी आपल्या सजग अभिनयाचा ठसा उमटवला. मग ती भूमिका खलनायकाची असो वा एका वृद्धाची भूमिका त्या त्या टप्प्यावर त्यांनी प्रभावीपणे प्रेक्षकांच्या मनात उतरवल्या. झपाटलेला मधील तात्या विंचू, श्रीयुत गंगाधर टिपरे मधला आबा या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
८० च्या दशकातील चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका देखील विशेष लक्षवेधी ठरली होती. चौकट राजा चित्रपटातून त्यांनी एका गतिमंद व्यक्तीची भूमिका अजरामर करून टाकली. एक डाव भुताचा, एक होता विदूषक, झपाटलेला, सरकारनामा, सरकार राज, वळू, गोळा बेरीज. पिंपळ, मी शिवाजी पार्क, नारबाची वाडी अशा अनेक अजरामर भूमिका त्यांनी गाजवल्या. श्रीयुत गंगाधर टिपरे, साळसूद, काम फत्ते, चिमणराव गुंड्याभाऊ त्यांच्या गाजलेल्या मालिका. त्यामुळे गेल्या पाच दशकाहून अधिक काळापासून दिलीप प्रभाळकर यांचा चित्रपट, नाट्य तसेच नालिका सृष्टीतला वावर वाखाणण्याजोगा ठरला आहे. त्यांच्या कारकिर्दीचा योग्य सन्मान व्हावा अशी प्रेक्षकांची देखील इच्छा आहे. त्यामुळे हा क्षण पसहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर झाले आहेत.