वाढदिवसाचे औचित्य साधून बरेचसे कलाकार मंडळी प्रेमात असल्याची जाहीरपणे कबुली देतात. रुचिरा जाधव, भाग्यश्री मोटे ते अगदी सई ताम्हणकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत बॉयफ्रेंड सोबत फोटो शेअर केले होते. आणि प्रेमात असल्याचे चाहत्यांसोबत जाहीर कबूल केले होते. भाग्यश्रीने तर काही दिवसांपूर्वीच विजय पालांडे सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन गर्लफ्रेंड सोबत दाखल झाला होता. भाग्यश्री पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात हिने देखील प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली आहे. वनिता ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्याचे नाव आहे सुमित लोंढे.
वनिता खरात हिने अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून अभिनेत्री म्हणून काम केले आहे. बॉलिवूड चित्रपटातही तिला झळकण्याची संधी मिळाली आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच मोठं कौतुक करण्यात आलं. वनिताने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून अनेक प्रहसन सादर केले. विविधांगी भूमिकेतून तिने प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याचे काम केले आहे. मध्यंतरी बोल्ड फोटोशूटमुळे वनिता चांगलीच चर्चेत आली होती. बॉडी शेमिंगचा तिला त्रास सहन करावा लागत असला तरी आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आज वनिताच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून तिने सुमितच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.
‘कूछ तुने सी है रफू ये डोरीयां हॅप्पी बर्थडे साथी’ असे हटके कॅप्शन देऊन वनिताने ही बातमी शेअर केलेली पाहायला मिळत आहे. तिच्या या कबुलीवर नम्रता संभेराव हिने देखील सूचक प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. हास्यजत्रा मधील नम्रता संभेराव हिने ‘अनाऊन्समेन्ट’ असे कॅप्शन देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वनिता प्रेमात आकंठ बुडाली आहे तो सुमित व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. या दोघांची मैत्री आता लवकरच सुंदर नात्याच्या बंधनात अडकताना दिसणार आहे. हास्यजत्रा मधील बरीचशी कलाकार मंडळी सुमितला देखील ओळखतात. त्यामुळे ह्या सर्वांना हे प्रेम प्रकरण अगोदर पासूनच माहीत असावे. मात्र आता प्रथमच त्यांनी जाहीरपणे कबुली दिली आहे.