नुकत्याच पार पडलेल्या ५७ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने उषा नाईक यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीचा आढावा सांगितलेला पाहायला मिळाला. कला क्षेत्रातील राजकारणाबद्दलही त्यांनी एक खंत व्यक्त केली. आपल्या कामासाठी कधी पुरस्कार मिळावा असं त्यांना कधीच वाटलं नाही. पण त्यांच्यासाठी काही लोकांनी थेट बहिष्कारच टाकून वाद घडवला होता.
उषा नाईक अभिनय क्षेत्रात दाखल झाल्या त्या ओघानेच. हुबळी, बेळगाव येथे त्या लहाणाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून त्याठिकाणी प्रसिद्धी मिळवली होती. पण एक दिवस लावणी नृत्य येत नाही म्हणून त्यांचा एकेठिकाणी अपमान झाला. काहीही करून लावणी नृत्य शिकायचं म्हणून त्या वडिलांसोबत कोल्हापूरला आल्या. तिथेच नृत्य शिकत असताना एका मैत्रिणीसोबत त्यांना स्टुडिओत जाण्याची संधी मिळाली. तिथे माया जाधव सारख्या बऱ्याच नवख्या नर्तकी होत्या. रंजन साळवी यांनी उषा नाईक यांना पाहिलं आणि त्या गाण्यात नृत्याची संधी दिली. अनंत माने यांनी त्या मुलींमध्ये उषा नाईक यांना हेरलं आणि सर्वात पुढं उभं केलं. यानंतर उषा नाईक यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक नृत्यांगना म्हणून काम केलं.
यातूनच त्यांना बन्या बापू हा चित्रपट मिळाला आणि अभिनेत्री म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला. कलावंती, सामना, हळदी कुंकू, सुशीला असे अनेक चित्रपट उषा नाईक यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवले. त्यावर्षी तब्बल चार चित्रपटामुळे उषा नाईक यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांनाच मिळावा असा त्यागराज पेंढारकर यांचा हट्ट होता. पण दादा कोंडके यांनी हा पुरस्कार उषा चव्हाणलाच मिळावा यावर अडून होते. तुम्हाला पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही दादा कोंडके यांच्याशी भांडतोय असं त्यागराज पेंढारकर उषा नाईक यांना म्हणाले होते. त्यावेळी परीक्षकांनीही उषा नाईक यांचीच बाजू घेतली होती. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार कोणाला द्यायचं ते द्या म्हणत पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकला होता.
या वादातून तोडगा काढण्यासाठी एक उपाय सुचवण्यात आला. त्यावर्षी विशेष अभिनेत्री म्हणून उषा नाईक यांना पुरस्कार देण्यात आला. आपल्यापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती असे उषा नाईक या मुलाखतीत सांगतात. तर अशोक सराफ यांना सुंबरान गाऊ चला गाण्यासाठी त्यावर्षीचा विशेष अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. उषा नाईक यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अपमान पचवले होते. बाळासाहेब सरपोतदार यांच्याकडे काम करायचं नाही असा हट्ट त्यांनी धरला होता. कारण पाहूणी या चित्रपटात त्यांचा गेस्ट अपिरन्स होता. तेव्हा ही कालची मुलगी आहे आणि हिला एवढे पैसे द्यायचे का म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपट मिळाले नाही तरी चालतील पण या माणसाकडे काम करायचं नाही हे त्यांचं ठरलेलं होतं.