अध्यात्मिक, धार्मिक मालिकांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सन मराठी वाहिनीने ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. सोमवारी १७ जुलै रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वेतोबा या देवतेवर ही मालिका आधारीत आहे. वेतोबा म्हणजेच भूतनाथ पण लोकांच्या हाकेला तो धावून येतो म्हणून त्याला देवाचे स्थान दिले आहे. कोणालाही रस्त्यात चकवा लावला, त्याच्यावर संकट ओढवले की हा वेतोबा भक्तांना मार्ग दाखवतो. संकटातून बाहेर काढतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.
कोकणचे सौंदर्य हे अनेकांना भुरळ घालणारे ठरले आहे. मात्र इथल्या गूढ कथाचेही कुतूहल अनेकांना आहे. त्यामुळे ही मालिका केवळ कोकण वासीयांपुरती मर्यादित नसून तमाम मराठी प्रेक्षकांना पाहायला आवडणार आहे. मालिकेच्या प्रमोशन निमित्त ठाण्यातील मासुंदा तलाव येथे वेतोबाची ५० फुटी प्रतिकृती उभारण्यात आली. यावेळी मालिकेतील कलाकार मंडळी आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावली होती. श्री वेतोबाचे देवस्थान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली या गावात वसलेलं आहे. सतराव्या शतकात या देवतेची मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती. आणि म्हणूनच दर शंभर वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे. पण तेथील एका स्थानिक शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बनवली आणि १९९६ मध्ये त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मालिकेत वेतोबाच्या भूमिकेत उमाकांत पाटील झळकत आहे. दीपक कदम, निकिता साळगावकर आणि अशा बऱ्याच कलाकारांची साथ मिळाली आहे. उमाकांत पाटील याने बॉलिवूड चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गंगुबाई काठियावाडी, सूर्यवंशी, रोहित शेट्टीच्या सर्कस तसेच हॉलिवूड चित्रपटातही उमाकांतने अभिनय साकारला आहे. गाथा नवनाथांची ही मालिका तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून उमाकांत प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. त्याच्या भारदस्त शरीरयष्टीमुळे बऱ्याचदा त्याच्या वाट्याला पोलिसांच्या भूमिका आल्या आहेत. त्याचमुळे वेतोबाच्या दमदार भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. उमाकांत या भूमिकेला योग्य न्याय देईल असा प्रेक्षकांना देखील विश्वास आहे. या दमदार भूमिकेसाठी उमाकांत पाटील याचे अभिनंदन.