मराठी संगीत नाटकातून लोकप्रियता मिळवलेले प्रसिद्ध अभिनेते सुनील जोशी यांचे काल २ मार्च रोजी दुःखद निधन झाले. सुनील जोशी यांच्या अचानक जाण्याने कलासृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे. हे वय जाण्याचं नव्हतं, अशी खेदजनक प्रतिक्रिया त्यांच्या सहकालाकारांकडून व्यक्त केली जात आहे. सुनील जोशी यांनी टिळक आणि आगरकर, संगीत गीत गाती ज्ञानेश्वर, संगीत जय जय गौरीशंकर, संगीत गोरा कुंभार या नाटकातून अभिनय साकारला होता. नाट्य निर्माते तसेच दिग्दर्शक अशीही त्यांनी ओळख जपली होती. दोन आठवड्यापूर्वी सुनील जोशी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
यावेळी त्यांच्या सहकलाकारांनी बरे झाल्यानंतर त्यांच्यासोबत पुन्हा त्याच जोमाने काम करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. नाटकातून काम करत असताना सुनील जोशी यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. प्रसिद्ध नाट्य अभिनेते आकाश भडसावळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. शेवटी अशी भेट व्हायची होती तर? टिळक आणि आगरकर नाटकात आगरकर दम्याच्या आजाराने वयाच्या ३९ व्या वर्षी जातात आणि टिळक त्यांना भेटायला येतात. तेव्हा आगरकर, मला फसवलंस! असं म्हणून टिळकांनी फोडलेला टाहो जितका तेव्हा विदारक वाटायचा; त्याहून कितीतरी पट तो आज भयंकर वाटतोय. टिळक आणि आगरकर तसे एकाच वयाचे, किंबहुना काही दिवसांनी आगरकर थोडे मोठे. प्रत्यक्षात मात्र टिळक आगरकर या भूमिका करणाऱ्या आपल्या दोघांत वयाचे फार अंतर!
पण तरीही बळवंता हे काही जायचे वय नव्हे. नाटकात आगरकरांनी एक्झिट फार लवकर घेतली, पण इथे टिळक तुम्ही या आगरकरला अर्ध्यावर सोडून गेलात. अजून खूप काही एकत्र करायचं होतं, बालगंधर्व उभं करायचं होतं. हे बंध रेशमाचे तर काहीच तालमीत उभं राहणारं होतं. तुम्हाला नाट्य परिषदेचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाचा गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार. मुंबई मराठी साहित्य संघाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती जय जय गौरीशंकर नाटकासाठी स्वरबहार विश्वनाथ बागुल पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. मात्र तुम्हाला वयाच्या ७५ व्या वर्षी जीवनगौरव घेताना पाहायचं होतं. खऱ्या आयुष्यातही आपण टिळक आगरकर होऊन वैचारिक रित्या भांडलो, पण शेवटपर्यंत आपली मैत्री.
एकमेकांच्या कामविषयीचा आदर आणि एकमेकांच्या प्रति असलेली प्रेमभावना कायम होती. २ आठवड्यापूर्वी तुमच्या पायावर शस्त्रक्रिया झाली तरीही तुम्ही पुन्हा उभे राहाल याची खात्री होती. मला सावरकर ही ओळख तुमच्यामुळे मिळाली, आगरकर म्हणून मला तुम्ही उभं केलं. संगीत नाटकाचे धडे तुमच्याकडून गिरवले. पण या आगरकराला असे अर्ध्यातच सोडून जाल असं वाटलं नव्हतं. आज मला म्हणावसं वाटतंय “बळवंता, मला फसवलंस रे! शेवटी अशी भेट व्हायची होती.” नाट्य निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक सुनील रमेश जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.