मराठी सृष्टीत खूप कमी नायिका आहेत ज्या डॅशिंग भूमिकेत पाहायला मिळाल्या आहेत. सुषमा शिरोमणी या त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील. दुर्दैवाने चित्रपटातून पुरुषाच्या बरोबरीने फायटिंग सिन करणारी ही नायिका खूप कमी चित्रपटातून पाहायला मिळाली. खरं तर अशा पठडीतल्या नायिकांना लॉन्च करणे म्हणजे मोठं दिव्याचं काम. कारण जिथे पुरुषप्रधान चित्रपटात स्रियांना लाजऱ्याबुजऱ्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले जाते तिथे अशा नायिकांना खूप कमी संधी दिली जाते. त्याचमुळे सुषमा शिरोमणी यांनी स्वतःच चित्रपट बनवले आणि त्यात स्वतःलाच नायिका म्हणून लॉन्चही केले.
भिंगरी, फटाकडी, मोसंबी नारंगी, भन्नाट भानू, गुलछडी अशा दमदार चित्रपटातून सुषमा शिरोमणी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. गाव जत्रांमध्ये त्यांच्या हाणामारीच्या सिनला शिट्ट्या आणि टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडायचा. विशेष म्हणजे आपल्या चित्रपटातून त्यांनी हिंदी कलाकारांना देखील नाचवलं होतं. बॉलिवूड कलाकारांना आपल्या चित्रपटात नाचवणाऱ्या सुषमा शिरोमणी यांना ही वेगळी ओळख मिळाली होती. भिंगरी चित्रपटात अरुणा इराणी, फटाकडी चित्रपटातून रेखा, गुलछडी चित्रपटातून रती अग्निहोत्री तर भन्नाट भानू मध्ये त्यांनी मौसमी चॅटर्जीला नाचवलं. मोसंबी नारंगी चित्रपटातून जितेंद्र यांना त्यांनी नाचवलं आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर चित्रित झालेली ही गाणी देखील तुफान लोकप्रिय ठरली.
सुषमा शिरोमणी यांनी मराठी चित्रपट सृष्टीत अगदी मोजक्याच चित्रपटातून काम केलं आहे. मात्र त्यांच्या दमदार भूमिका तेवढ्याच प्रसिद्धी मिळवून गेल्या आहेत. अभिनया सोबतच त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन क्षेत्रात देखील धडाकेबाज कामगिरी केली होती. मराठी चित्रपटासोबतच त्यांनी प्यार का कर्ज या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. यात मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, नीलम आणि मीनाक्षी शेषाद्री सारख्या आघाडीच्या कलाकारांना त्यांनी मुख्य भूमिका देऊ केली. अरुण शांडील याच्याशी त्या विवाहबंधनात अडकल्या. मधल्या काळात त्या इम्पा या चित्रपट निर्मिती संस्थेशी जोडल्या गेल्या. याशिवाय ऑस्कर अवॉर्डच्या चेअर पर्सन म्हणूनही काम करताना दिसल्या.
काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील हे तर काहीच नायच्या मंचावरून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी ऑस्कर पुरस्कारासाठी लगान चित्रपटाला त्यांनी प्राधान्य दिले असल्याचे सांगितले होते. अशोका चित्रपटाला देखील हा पुरस्कार मिळावा म्हणून शाहरुख खानने सुषमा शिरोमणी यांच्याकडे खूप विनंती केली होती. मात्र मी माझं इमान त्यावेळी पूर्णपणे राखून हा पुरस्कार लगान चित्रपटासाठी देऊ केला. अशी छानशी आठवण सुषमा शिरोमणी यांनी त्यावेळी सांगितली होती. आज सुषमा शिरोमणी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने रसिक प्रेक्षकांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.