ठिपक्यांची रांगोळी मालिका फेम अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याने ठाण्यात महाराज या नावाने पावभाजीचे हॉटेल सुरू केले होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचं हे हॉटेल अचानक बंद असल्याचं अनेकांना समजलं. त्यामुळे अनेक खवय्यांनी तसेच सुप्रिया पाठारे यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अनेकांनी सुप्रिया पाठारे यांच्याकडे तशी चौकशी देखील सुरू केली होती. पण आता चाहत्यांची ही काळजी पाहून सुप्रिया पाठारे यांनी याचे कारण सांगितले आहे.
महाराज हॉटेल बंद झाले नसून ते पुन्हा ३ नोव्हेंबर पासून सुरू होईल असे त्यांनी म्हटले आहे. महाराज हॉटेलमध्ये स्पेशल पावभाजी खाण्यासाठी अनेक खवय्ये तिथे हजेरी लावत होते. पण अचानक हॉटेल बंद असल्याचे पाहून त्यांना तसे मेसेजेस आणि फोन कॉल्स येऊ लागले होते. तेंव्हा याचे कारण सांगताना त्या म्हणतात की, खूप जणांना ऐकायला मिळालं की महाराज हॉटेल बंद झालं पण तसं मुळीच नाहीये. २१ तारखेला माझ्या आईचं निधन झालं होतं. कालच तिचं कार्य पार पडलं. या दुःखातून स्वतःला सावरत आम्ही आता पुन्हा कामाला लागलो आहोत.
येत्या ३ तारखेपासून म्हणजेच ३ नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा महाराज हॉटेल सुरू करतोय. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नक्की या आणि महाराज पावभाजीचा आस्वाद घ्या. सुप्रिया पाठारे यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता सेलिब्रिटींनी तसेच खवय्यांनी देखील ही महाराजला भेट देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर हा शेफ आहे. परदेशात शेफची नोकरी केल्यानंतर तो पुन्हा मायदेशी परतला. आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात न येता त्याने स्वतःच्या व्यवसायाची वाट धरली. यात त्याला आई सुप्रियाची खूप मोठी साथ मिळाली.
सुरुवातीला त्याने महाराज या नावाने पावभाजीचा फूड ट्रक सुरू केला होता. अल्पावधीतच त्याच्या या व्यवसायाला भरभराटी मिळत गेली. तेव्हा काहीच महिन्यांपूर्वी त्याने हा फूडट्रकचा व्यवसाय हॉटेलच्या स्वरूपात बदलण्याचा निर्णय घेतला. त्याच्या हॉटेलची ही स्पेशल पावभाजी खायला ठाण्यातील खवय्येच नाही तर सेलिब्रिटींनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. सुप्रिया पाठारे या सुद्धा जसा शूटिंग मधून वेळ मिळेल तसे मिहिरच्या कामात मदत करत असतात.