मराठी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवल्यानंतर व्ही शांताराम यांनी आपली पाऊलं हिंदी सृष्टीकडे वळवली होती. त्यामुळे १९४७ च्या सुमारास मराठी चित्रपट सृष्टीत अवघे एक ते दोन चित्रपट बनवले जात होते. हा पडता काळ सावरण्याचे काम राजा परांजपे यांनी केले होते. आज २४ एप्रिल राजा भाऊंचा जन्मदिवस, या दिवसाचे खास औचित्य साधून त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मिरज येथे सर्वसामान्य कुटुंबात राजा भाऊंचा जन्म झाला. त्यांचे वडील बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते. शालेय शिक्षणात मुळीच रस नसलेल्या राजाभाऊंना ऑर्गन वाजवण्याची भारी हौस होती.
हार्मोनियम वाजवण्यात आणि कॅरम खेळण्यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. पुण्यातील सर्वोत्तम कॅरमपट्टू म्हणून ते ओळखले जात होते. पुढे सिनेमा पहायला मिळावं म्हणून मुकपट चालू असताना ते पडद्यासमोर बसून पार्श्वसंगीत देण्यासाठी हार्मोनियम, तबला वाजवण्याचे काम करू लागले. यामुळे सिनेमा पाहण्याची त्यांची हौस पूर्ण होऊ लागली. पुढे अभिनयाची आवड निर्माण झाल्याने कलाकाराच्या अनुपस्थितीत त्यांचे काम करू लागले. भालजी पेंढारकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांना काम दिले. १९४७ साली बलिदान उर्फ दो कलियां चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. पण दिग्दर्शक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली ती जीवाचा सखा चित्रपटातून.
अभिनय, दिग्दर्शन, लेखन, गायन अशा विविध माध्यमातून त्यांनी चौफेर मुशाफिरी केली.
पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, सुवासिनी, बंदिनी, पेडगावचे शहाणे अशा अनेक चित्रपटातून राजा परांजपे यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली.चित्रपट सृष्टीत येण्याअगोदर राजा परांजपे यांना पत्नीची मोठी साथ मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी शासकीय शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. निला कुरुळकर आणि चंद्रशेखर परांजपे ही त्यांची अपत्ये. शूटिंग आटोपून घरी यायला कितीही उशीर झाला तरी ते जेवण करून दत्ताचे नामस्मरण करून मगच झोपत असत. आपल्या चित्रपटांचे पहिले तिकीट पत्नीला पैसे देऊन काढायला लावत असत. त्यानंतर हे चित्रपट जोरदार चालत असत. राजाभाऊ दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळवू लागले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला नोकरी सोडायला लावली होती.
माणूस म्हणून राजाभाऊंनी अनेक व्यक्तींना जवळ केले होते. बाप बेटे चित्रपट मद्रासला शूट करण्यात आला. त्यावेळी रमेश देव यांना त्यांनी अभिनयाची संधी देऊ केली होती. फर्स्ट क्लासचे तिकीट काढून मद्रासला ये असे त्यांनी पत्राद्वारे सांगितले होते. याला कारण असे होते की, आपला मराठी माणूस कुठेही गेला तरी वरचढ ठरला पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांच्या दिग्दर्शनातील बारकावे कलाकारांना रिटेक घ्यायला भाग पाडायचे. याचमुळे त्यांचे चित्रपट जोरदार चालले होते.