झी मराठी वाहिनीची मालिका म्हटले की सर्वच कलाकार या वाहिनीवर काम करण्यास उत्सुक असतात. कारण बऱ्याचशा कलाकारांना झी वाहिनीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे बहुतेक सर्वच कलाकारांचे झी वाहिनीशी नाते तेवढेच घट्ट असलेले पाहायला मिळते. या वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यात आता आणखी एका मालिकेची भर होणार आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर या लोकप्रिय जोडीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करून ‘नवा गडी नवं राज्य’ तसेच ‘हृदयी प्रीत जागते’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या.
या दोघांप्रमाणे सुबोध भावे आणि पत्नी मंजिरी भावे यांनी देखील मालिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. कान्हाज मॅजिक या त्यांच्या निर्मिती संस्थेतून ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई?’ ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सासू सुनेच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या आजवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकेतून देखील सासू सुनेची नोकझोक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शेर सासूबाईंच्या नशिबात सव्वाशेर सुनबाई आली आहे आणि त्यामुळे त्यांच्यातील वादांची जुगलबंदी पाहायला प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक झालेले आहेत. सासूच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी तर सूनबाईच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर झळकणार असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सोनी मराठीवरील असे हे सुंदर आमचे घर या मालिकेत त्या सासूबाईंच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेताच सुकन्या कुलकर्णी यांच्याकडे झी वाहिनीचा प्रोजेक्ट आला आणि या नवीन भूमिकेसाठी त्यांनी आपला होकार दिला. चूक भूल द्यावी घ्यावी या मालिकेनंतर त्या जवळपास चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा झी मराठी वाहिनीकडे वळल्या आहेत. आभाळमाया, जुळून येती रेशीमगाठी, घाडगे अँड सून या त्यांच्या गाजलेल्या मालिका. तर स्वानंदी देखील दिल दोस्ती दोबारा मालिकेनंतर पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीकडे वळलेली आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी मराठी सृष्टीत माई म्हणून जास्त ओळख मिळवली आहे. त्यामुळे हक्काने त्यांना माई म्हणूनच हाक मारली जाते.
आजवरच्या कारकिर्दीत सुकन्या कुलकर्णी यांनी अनेक दर्जेदार भूमिका निभावल्या आहेत. सोज्वळ, समंजस आणि तेवढीच प्रेमळ आई, सासू त्यांनी चित्रपट मालिकांमधून साकारल्या आहेत. अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? मालिकेतील त्यांची सासूबाईची भूमिका थोडीशी विरोधी दाखवण्यात आली आहे. अर्थात ही भूमिका खलनायिका ढंगाची नसली तरी त्यातून विनोद निर्मिती करण्याचा नक्कीच प्रयत्न करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. पोमोमधून त्यांची भूमिका कशा धाटणीची असावी याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास सुकन्या कुलकर्णी यांचे झी वाहिनीवर पुनरागमन होत असल्याने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.