बांदेकर कुटुंब आता निर्मिती क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ लागलं आहे. मुलगा सोहमच्या नावाने त्यांनी निर्मिती संस्था काढली असून सध्या त्यांच्या दोन मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहेत. ठरलं तर मग या त्यांच्या मालिकेला प्रेक्षकांनी आजवर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तर नुकत्याच सुरू झालेल्या घरोघरी मातीच्या चुली या कौटुंबिक मालिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. दरम्यान लवकरच ते कलर्स मराठी वाहिनीवर सुख कळले ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या निमित्ताने बांदेकर कुटुंब पुन्हा एकदा एकत्र जमले होते.

त्यावेळी त्यांनी आयुष्यातल्या अनेक गमतीजमती प्रेक्षकांसोबत शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. याच मुलाखतीत सुचित्रा बांदेकर यांनी सासूबाईंसोबतचा एक किस्सा शेअर केला. सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नावेळी सुचित्रा अवघ्या १९ वर्षांच्या होत्या. लग्न करून सासरी राहत असताना पहिलाच सण वटपौर्णिमेचा होता. यादिवशी कडक उपवास करायचा असे त्यांच्या सासूबाईंनी सुचित्राला सांगितले होते. अगदी निर्जळी उपवास करायचा म्हणून सुचित्रा सकाळीच उठून अंघोळ करून देवघराजवळ आल्या. त्यांच्या सासूबाईंनी अगोदरच पूजा करून घेतली होती. त्यामुळे हळदी कुंकू वाहून देवाला नमस्कार करून जवळ पानावर ठेवलेला प्रसाद सासऱ्यांना द्यायला सांगितला. त्यानंतर आदेशला आणि नंतर धाकट्या दिराला द्यायला सांगितला.

सुचित्रा यांनी सासूबाईंच्या म्हणण्यानुसार सगळं रीतसर केलं. पण त्यानंतर सासूबाईंनी त्यांना आता पोटभर नाश्ता कर आणि इथून पुढे कधीच वटपौर्णिमा साजरी नाही केली तरी चालेल असा सल्ला दिला. खरं तर निर्जळी उपवास करायचा म्हणून सुचित्रा बांदेकर अगोदरच मनाची तयारी करून बसल्या होत्या. पण सासूबाईंनी अचानक असा सल्ला दिल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. यावर आदेश बांदेकर सांगतात की, माझी आई ही आधुनिक विचारांची होती. ती एक वर्किंग वूमन होती. नर्स म्हणून त्या सेवा करत असत. आपल्याला असं कधी कधी वाटतं की आताच्या पिढीतल यांना काय कळणार. पण जुन्या नव्या विचारांची सांगड घालत वटपौर्णिमेच जे सार आहे ते लक्षात राहुद्या आणि कामाला लागा. स्पर्धेचं युग आहे त्यात तुम्हाला धावायचंय त्यामुळे वेळ बघून कामाला लागा हा विचार तिने दिला, ती फार ग्रेट होती. अशी सासूबाईंची एक गोड आठवण सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांनी सांगितली.