रस्त्या रस्त्यावर अनेक भिकारी अनेकजणांकडून थोड्यातरी पैशाची मदत मिळवतात. परंतु अशा वृत्तीमुळे वेगळ्याच घटना घडू लागल्याने आणि त्या घटना अधिक बळावत चालल्याने मराठी कलाकार पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट अभिनेते प्रदीप कबरे यांनी नुकतेच या भिकाऱ्यांना पैशाची कुठलीही दानत करणार नाही असे म्हटले आहे त्याला त्यांनी कारण देखील सांगितलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट मराठी कलाकारांनी मोठ्या प्रमाणात शेअर करून त्यांच्या मताला पाठिंबा दर्शवला आहे.

अभिनेते शरद पोंक्षे, सुदेश म्हशीलकर आदींनी प्रदीप कबरे यांचे म्हणणे योग्य असल्याचे म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये प्रदीप कबरे यांनी नेमकं काय म्हटले आहे ते पाहुयात.. “आजपासून CASH भीक देणं बंद !!! भिकाऱ्यांना अन्न पाणी तर देऊ. पण, एकही रुपया कॅश देणार नाही. अशी मुंबई पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली आहे. मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो आणि ही चळवळ योग्यच आहे. कोणत्याही प्रकारची महिला पुरुष वृद्ध अपंग मुलं व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशांऐवजी अन्न पाणी देऊ पण आजपासून पैशांची भिक देणार नाही. याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावर ‘भिकारी’ या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलांचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल. सुरुवात करा, पोस्ट शेअर करा आणि कृपया एकही रुपया भिकाऱ्याला देऊ नका, खूप वाटलं तर गाडीत २ बिस्कीटचे पुडे ठेवा पण पैसे देऊ नका. या मोहिमेशी सहमत असल्यास, हा विचार पुढे पाठवा”. अशी विनंती त्यांनी आपल्या सहकलाकार आणि चाहते मंडळींना केली आहे.

प्रदीप कबरे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी तसेच हिंदी सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करताना दिसले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी २५ नाटकं, १५ चित्रपट आणि २५ हिंदी मराठी मालिका अभिनित केल्या आहे. अभिनेता, लेखक, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक या विविध भूमिका बजावत असताना त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून चोख जबाबदारी पार पाडली आहे. प्रदीप कबरे यांचे हे विचार पटल्याने त्यांची पोस्ट सध्या सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात शेअर करून या निर्णयाचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे.